तीन विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, शिपायाला घातले कोंडून
तासगाव : तालुक्यातील कवठेएकंद, नागाव (कवठे) येथील ग्रामसेवक शासकीय वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित नसतात. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेत होत नाही. गावच्या विकासावर परिणाम होत आहे. याबाबत पंचायत समिती प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही, असा आरोप करून संतप्त झालेल्या भाजपचे पंचायत समिती सदस्य संतोष आठवले यांनी ग्रामपंचायत विभागाला कुलूप ठोकून तीन विस्तार अधिकारी, एक ग्रामसेवक व एक शिपाई अशा पाच जणांना सुमारे तासभर कोंडून घातले.
यामुळे काही काळ पंचायत समितीत तणाव निर्माण झाला. अखेर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांच्या मध्यस्थीने वादावर पडदा टाकण्यात आला.
याबाबत माहिती अशी, कवठेएकंद, नागाव (कवठे) येथील ग्रामसेवक आपल्या कार्यालयात वेळेवर हजर नसतात. पंचायत समिती सदस्यांचा फोन उचलत नाहीत.
वैद्यकीय रजा काढून इतरत्र फिरत असतात. त्यामुळे गावच्या विकासकामांवर, नागरिकांच्या विविध कामावर परिणाम होत आहे, असा आरोप करून आठवले यांनी पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. मात्र आपल्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. ग्रामसेवकांच्या वर्तनात पण सुधारणा होत नाही, असा आरोप करून आठवले गेल्या काही दिवसांपासून चांगलेच संतप्त झाले होते.

आज (शुक्रवार) सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान ते पंचायत समितीत आले. तेथे ते थेट ग्रामपंचायत विभागात गेले. तेथे बसलेल्या विस्तार अधिकाऱ्यांना उद्देशून ‘कवठेएकंद, नागाव (कवठे) येथे ग्रामसेवक शासकीय वेळेत उपस्थित नसतात. आमचा फोनही ते उचलत नाहीत. वैद्यकीय रजेचा अर्ज देऊन ते इतरत्र फिरत असतात. रजेच्या काळात गावाला दुसरा ग्रामसेवक मिळाला नाही. मी ग्रामपंचायत विभागाला कुलूप ठोकणार आहे’, असे सांगून सर्वांना कार्यालयाच्या बाहेर होण्यास सांगितले. तेथे बसलेल्या विस्तार अधिकारी पी. के. सुतार, ए. के. पाटील, के. आर. पाटील, ग्रामसेवक सुभाष शिंदे व शिपाई अभय शिंदे यांनी ‘आम्ही शासकीय कर्मचारी आहोत.
आम्ही कसे कार्यालय सोडून बाहेर जाणार. तुमचा जो काय विषय आहे तो गटविकास अधिकाऱ्यांशी बोला. आपण चर्चेने मार्ग काढू’, असे सांगितले. मात्र आठवले काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी तीन विस्तार अधिकारी, ग्रामसेवक व शिपाई अशा पाच जणांना चक्क त्यांच्या कार्यालयात कोंडून घातले. ग्रामपंचायत विभागास कुलूप ठोकले.
