जत तालुक्यातील महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या गुड्डापुर येथील श्री दानम्मा देवी मंदिरास ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्र या ठिकाणी विविध विकास कामाकरिता पाच कोटी व तालुक्यातील बिळूर येथील श्री काळभैरवनाथ देवस्थान विकसित करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तिर्थक्षेत्र ‘ब’ योजनेअंतर्गत तीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आ. गोपीचंद पडळकर यांनी वेळोवेळी मंजूरीसाठी प्रयत्न केले आहेत, अशी माहिती जत तालुका भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. रवींद्र आरळी यांनी दिली.
डॉ. आरळी म्हणाले, जत तालुक्यांमध्ये अनेक ऐतिहासिक मंदिर आहेत. या मंदिरांना आतापर्यंत एवढा मोठा निधी मिळालेला नाही. वारंवार राज्य सरकारकडे गुड्डापूर येथील श्री धानम्मा देवी मंदिरास व बिळूर येथील श्री काळभैरवनाथ देवस्थानास ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतून निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता. याबाबत आ. पडळकर यांच्याकडे देखील वेळोवेळी मागणी केली होती.
देवस्थानचा होणार विकास
आ. पडळकर यांनी याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. श्री दानम्मा देवी मंदिरास ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत व वर्गातील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विविध विकास कामे करण्यासाठी पाच कोटींचा निधी व विळूर येथील श्री काळभैरवनाथ देवस्थान विकसित करण्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये देवस्थान परिसरातील अंतर्गत रस्ते तयार करणे, निवारा शेड बांधणे, अंतर्गत रस्ते तयार करणे, संरक्षक भिंत बांधणे तसेच या परिसरातील अंतर्गत रस्ते तयार करण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या देवस्थानचा संपूर्ण विकास होणारा असून आ. गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नाने हा निधी मंजूर करून दिला असून याबद्दल त्यांचे आम्ही अभिनंदन करत आहे, अशी माहिती डॉ. आरळी यांनी दिली.