सांगली : काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह बाळासाहेब सावंत यांच्या अथक प्रयत्नातून जत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, या संबंधीचा शासन निर्णय गुरूवारी (३ ऑक्टोबर) जारी करण्यात आला. नगरोत्थान अभियानांतर्गत हा प्रकल्प मंजूर करण्यात आला असून, त्यासाठी ७७ कोटी ९४ लाख रुपये खर्च करण्यास मान्यता मिळाली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जतकरांची तहान कायमस्वरुपी भागणार आहे.
नगरोत्थान अभियानांतर्गत जत नगरपरिषदेचा पाणी पुरवठा प्रकल्प नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीकडे सादर करण्यात आला होता. या प्रकल्पास मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे विभाग यांनी ‘तांत्रिक मान्यता दिली आहे. यासाठी आ. सावंत यांनी सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे ही योजना मार्गी लागली आहे. जत नगर परिषदेमार्फत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जत मतदारसंघात विकासाची कृष्णा नदी प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया आ. सावंत यांनी प्रकल्प मंजुरीनंतर दिली.
नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल ७७.९४ कोटींचा निधी मंजूर झाला असून, या योजनेमुळे जत शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला जाणार आहे. राज्य सरकारकडे पाणीपुरवठा योजनेसाठी मंजुरी मिळवण्यासाठी वेळोवेळी आ.सावंत यांनी विधानसभेत आवाज उठवला होता, आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. शहरातील पाईपलाईन जुनी झाल्याने वारंवार लिकेज होत असल्याची समस्या मांडली होती, तसेच वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या योजनेच्या त्वरित अंमलबजावणीची मागणी केली होती. शासनाच्या मंजुरीसह ७७.९४ कोटी निधी प्राप्त झाल्यामुळे जत शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने सुरु होणार आहे.
यामुळे जत शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळेल आणि त्यांचा दीर्घकालीन पाण्याचा प्रश्न कायमचा संपुष्टात येईल. प्रकल्प मंजूर झाल्याने जतकरांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आ. सावंत यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.