जत : जत तालुक्यातील पंचवीस ते तीस गावांतील एकूण ३०३ लोकांना नवरात्र उत्सवानिमित्त उपवास करणाऱ्या महिला व पुरुषांना भगरीच्या पिठातून विषबाधा झाल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे,दरम्यान याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जत शहरातील भगर पिठ होलसेल विक्री करण्यात आलेले जगदंबे ट्रेडिंग कंपनी हे होलसेल दुकान सील केले आहे.
विषबाधेच्या घटनेनंतर अन्न सुरक्षा विभागचे पथक जागे झाले.तातडीने जत शहरातील होलसेल विक्रेते जगदंबे ट्रेडिंग कपंनीचे अन्न भेसळ विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३ लाख ३४ हजार ९१८ किमतीचे भगरीचे विविध कंपनीचे पिठ जप्त केले.त्यातील नमुने घेण्यात आले आहेत. ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.अहवाल प्राप्त झाल्यानंतर दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे
अधिक माहिती अशी की, नवरात्र उत्सवनिमित्ताने उपवासासाठी जगदंबे ट्रेडिंग कंपनीचे मालक गणपत मोताराम पटेद यांच्या होलसेल दुकानाकडून भगरीचे पीठ तालुक्यातील पंधरा ते वीस गावातील दुकानदारांनी किरकोळ विक्रीकरिता घेऊन गेले होते. शुक्रवारी तालुक्यातील वाळेखिंडी, शेगाव, कुंभारीसह अनेक गावांतील नागरिकांना मळमळणे, चक्कर येणे, उलट्या होणे असा प्रकार सुरू झाला होता.
तर शनिवारी माडग्याळ, व्हसपेठ, आसंगी, वळसंगसह गावांतील नागरिकांना तोच त्रास झाल्याने त्यांना माडग्याळ ग्रामीण व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तीनशेवर महिलांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर शासकीय,खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.घटनेचे गांभिर्य ओळखून अन्न भेसळ विभागाचे एक पथक जत शहरात दाखल होत होलसेल दुकान सील करत कारवाई केली.