राज्य शासनाने १४ ऑक्टोबर रोजी निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्यात आली असून, १०० आणि २०० रुपयांचे मुद्रांक बंद करून ५०० रुपयांचे मुद्रांक लागू केले. त्यानुसार सर्वप्रकारचे व्यवहार आता ५०० रुपयांच्या मुद्रांकावर करावे लागत आहेत. जिल्ह्यात बुधवारपासून यासंदर्भातील अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, मुद्रांकासाठी सर्वसामान्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
प्रतिज्ञापत्र, भाडे करार, विविध कर्ज प्रकरणांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, विक्री करार, शैक्षणिक कामांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, आदी सर्वसाधारण कामांच्या व्यवहारासाठी यापूर्वी १०० रुपयांच्या मुद्रांकाचा वापर केला जात होता. परंतु, त्याच संबंधित कामांसाठी आता नागरिकांना ४०० रुपये जादा मोजावे लागत असून, ५०० रुपयांचा मुद्रांक घ्यावा लागत आहे.
तसेच हक्क सोडपत्रासाठी आतापर्यंत २०० रुपयांच्या मुद्रांकाचा वापर केला जात होता. त्यासाठीही आता ५०० रुपये मोजावे लागत आहेत. पूर्वी केलेल्या करारपत्राचा आता अंतिम विक्री दस्त करण्यासाठी वाढीव मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. मुद्रांक शुल्क आकारण्यात सुलभता व एकरूपता आणण्यासाठी तसेच शासनाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने ही सुधारणा करण्यात आल्याचे अध्यादेशात म्हटले आहे. परंतु, मुद्रांकासाठी वाढीव रकमेचा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.