आजपर्यंत आटपाडीच्या पाठिंब्यावर खानापूरकरांना आमदारकी सोपी होती मात्र माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी लढणार असल्याचे सांगितल्याने खानापूरकरांना पैरा फेडावा लागणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आटपाडीकरांना ९५ च्या आमदारकीनंतर आजपर्यंत उपेक्षितच रहावे लागले आहे.
खानापूर मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत लढतीची शक्यता आहे. महायुतीतील शिंदे शिवसेना गटास अधिकृतपणे जागा सुटल्यास सुहास बाबर यांची उमेदवारी निश्चित आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांची यावेळी काय भूमिका असणार? भाजपचे ब्रह्माशेठ पडळकर यांचीही भूमिका काय असणार? भाजपचे राजेंद्रअण्णा थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात आल्याने तसेच पक्ष असो वा अपक्ष असो त्यांच्या उमेदवारीच्या निर्धाराने या विधानसभा निवडणुकीचे ट्विस्ट वाढले आहे.
राजेंद्रअण्णांनी कार्यकर्त्यांच्या भेटींवर जोर दिलेला आहे. त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने विरोधक गोंधळात आहेत. राजेंद्रअण्णांनी ९५ ला विद्यमान आमदार असताना खानापूरकरांना पाठिंबा देऊन आमदार केले. एकूण पाच वेळा खानापूरकरांना पाठिंबा दिला. बाबर गटाला तीन वेळा आमदारकी मिळाली. सदाभाऊ दोन वेळा झाले. एकदा तरी पैरा फेडा, असे म्हणून कार्यकर्ते दोन्ही गटास भेटले. राजेंद्रअण्णा गटास आटपाडीचा आमदार अपेक्षित आहे. आटपाडीचा आमदार नसल्याने टेंभू योजनेचे पाणी पदरात पडत नाही. माणगंगा साखर कारखाना सुरू होण्यास अडथळा आहे. राजेवाडी तलावात पाणी येण्याची वाट सुकर होणार आहे.
दुरंगी, तिरंगी किंवा चौरंगी लढत झाल्यास नेमके काय होणार ?
२००९ पर्यंत तीन गटात लढत होती. २००९ च्या गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीने निकाल फिरला. राजेंद्रअण्णांनी अनिल बाबर यांना पाठिंबा देऊनही ते सदाभाऊ पाटील यांच्याकडून हरले. २०१४ ला खानापूरचे दोघे आणि आटपाडीचे दोघे उभा होते. त्यावेळी अनिल बाबर यांनी बाजी मारली. दुरंगी, तिरंगी किंवा चौरंगी लढत लागल्यास नेमके काय होणार? महाविकास आघाडीची मोट बांधण्याने कोणी आमदार होणार का? जयंतराव पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची आशा असल्याने ते खानापूर मतदारसंघातून अपेक्षित असणार का?… २५ वर्षानंतर आटपाडीकरांची आमदारकीची अपेक्षा पूर्ण होणार का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.