दिवाळीपूर्वी उद्योगधंदे करणाऱ्या उद्योजकांना मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे. आता त्यांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत पूर्वर्वीपेक्षा दुप्पट कर्ज मिळू शकणार आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत, मुद्रा कर्जाची मर्यादा सध्याच्या १० लाख रुपयांवरून २० लाख रुपये करण्यात आली आहे. या निर्णयाबाबत सरकारने अधिसूचनाही जारी केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै २०२४ रोजी आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली होती की, प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत १० लाख रुपयांची कर्ज मर्यादा वाढवून २० लाख करण्यात येईल.
आता या घोषणेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की, ही मर्यादा वाढवल्याने मुद्रा योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल आणि अशा नवीन उद्योजकांना ज्यांना निधीची गरज आहे ते आता त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी अधिक निधी उपलब्ध करून देऊ शकतील. सध्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेत शिशु, किशोर आणि तरुण अशा तीन श्रेणी आहेत ज्या अंतर्गत कर्ज दिले जाते. आता तरुण प्लस नावाची नवीन श्रेणी सुरू करण्यात आली आहे. मुद्रा योजनेअंतर्गत ५०,००० रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे.

मुद्रा कर्जासाठी कोण पात्र आहे ?
मुद्रा कर्ज ही भारतातील एक सरकारी योजना आहे जी सूक्ष्म आणि लघु उद्योगांना व्यवसाय विकासासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते. पात्रतेमध्ये गैर-कॉर्पोरेट लघु व्यवसाय, सूक्ष्म-उद्योग आणि उत्पादन, व्यापार, सेवा आणि कृषी-संबंधित क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश होतो.