‘
मतदारांची दिशाभूल करण्यासाठी विरोधकांचे कुभांड : ‘पिपाणी’ चिन्ह मिळवून देण्याच्या हालचाली : रोहित पाटलांना झटका बसणार का?
नावात काय आहे? असे म्हटले जाते. पण आता नावात सगळं आहे, असं म्हणायची वेळ आली आहे. तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांच्या नावाशी साम्य असणाऱ्या अन्य तीन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. एकाच नावाचे अनेक उमेदवार झाल्यास मतदारांची दिशाभूल करून त्याचा फटका रोहित पाटील यांना बसले, असे कुभांड विरोधकांनी रचले आहे. अन्य रोहित पाटील यांच्यापैकी एकाला पिपाणी हे चिन्ह मिळवून देण्याच्याही हालचाली सुरू आहेत. त्यामुळे पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हांमुळे मतदारांची दिशाभूल होईल. त्याचा तोटा रोहित पाटील यांना बसेल, असे गणित विरोधकांनी बांधले आहे.
तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पाटील व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय पाटील यांच्यात 'सामना' होत आहे. या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. या लढतीच्या निमित्ताने स्व. आर. आर. पाटील व संजय पाटील गटातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. दोन्ही गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी संजय पाटील यांनी भाजपमधून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभेतील पराभवानंतर हा गट विस्कळीत होण्याच्या मार्गावर होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत अस्तित्व दाखवण्याशिवाय संजय पाटील यांच्यासमोर पर्याय नव्हता. जर विधानसभा निवडणुकीत अस्तित्व दाखवले नाही तर आगामी पाच वर्षाच्या काळात गटाची वाताहत झाली असती. त्यामुळे गटाची मोळी बांधून ठेवणे मुश्किलीचे ठरले असते.
म्हणूनच संजय पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. अजित पवार यांच्याकडून विधानसभेची उमेदवारी मिळवली. त्यामुळे आता अनेक वर्षानंतर आर. आर. पाटील व संजय पाटील हे पारंपारिक प्रतिस्पर्धी गट आमने-सामने आले आहेत. संजय पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची तर रोहित पाटील यांच्यासाठी ती प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे दोन्हीही गटांकडून ही निवडणूक जिंकण्यासाठी साम - दाम - दंड - भेद या नीतीचा अवलंब केला जात आहे.
या निवडणुकीसाठी संजय पाटील, रोहित पाटील यांच्यासह तब्बल 33 उमेदवार रिंगणात आहेत. विविध पक्षांकडून तसेच अपक्षांनीही या निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, अर्ज माघारीसाठी सोमवार दि. 4 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अखेरची मुदत आहे. त्यानंतरच नेमके किती जण विधानसभेच्या रिंगणात राहतात, हे स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, अर्ज भरताना विरोधकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांची कोंडी करण्याचा अटोकाट प्रयत्न केला आहे. रोहित पाटील यांच्या नावाची साम्य असणाऱ्या अन्य तीन उमेदवारांना या निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज दाखल करायला लावले आहेत. त्यामध्ये रोहित रावसाहेब पाटील (रा. चिंचणी), रोहित राजेंद्र पाटील (रा. निमणी), रोहित राजगोंडा पाटील (रा. नेहरूनगर) यांचा समावेश आहे.
एकाच नावाचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार झाल्यास मतदारांची दिशाभूल होऊ शकते. यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पाटील यांना पडणाऱ्या मतांचे विभाजन होईल. त्याचा त्यांना फटका बसेल, असे गणित विरोधकांनी बांधले आहे. तर यातील एका रोहित पाटील यांना पिपाणी हे चिन्ह मिळवून देण्याच्याही हालचाली सुरू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पाटील यांच्या 'तुतारी वाजवणारा माणूस' व अन्य रोहित पाटील यांच्या 'पिपाणी' या चिन्हांमधील साम्यामुळे मतदार संभ्रमात पडू शकतात. त्यामुळे मतांचे विभाजन करून रोहित पाटील यांना अडचणीत आणण्याचे कुभांड विरोधकांनी रचले आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या रोहित पाटील यांचे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह..!
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह आता राज्यभर रुजले आहे. तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघातही हे चिन्ह मोठ्या प्रमाणावर रुजले आहे. त्यामुळे रोहित पाटील यांच्या नावाशी साम्य असणारे कितीही उमेदवार उभे केले तरी फरक पडणार नाही. त्यांना 'पिपाणी' हे चिन्ह देऊन मतदारांची दिशाभूल होणार नाही. विरोधकांचे कारस्थान मतदार हाणून पाडतील. आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित रावसाहेब पाटील यांचे 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह आहे, असे स्पष्टीकरण रोहित पाटील समर्थकांकडून देण्यात आले आहे.