सांगली : जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत गहाळ झालेले सात लाख ५० हजार रुपयांचे ६० मोबाईल मूळ मालकांना पोलिस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्या हस्ते परत देण्यात आले. सांगली पोलिस मुख्यालयात हा उपक्रम पार पडला.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गहाळ मोबाईलचा शोध घेण्यासाठी खास पथक नेमले होते. त्यांनी जिल्ह्यातील गहाळ मोबाईलचा शोध घेऊन सात लाख ५० हजारांचे ६० मोबाईल हस्तगत केले. सायबर पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक रूपाली बोबडे आणि पोलिस उपनिरीक्षक अफरोज पठाण, तसेच पोलिस कर्मचारी करण परदेशी, विवेक साळुंखे, रेखा कोळी, रूपाली पवार, गणेश नरळे, अभिजित पाटील, आदींच्या पथकाने मोबाईलचा शोध घेतला. पोलिस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात गहाळ मोबाईल संबंधितांना परत देण्यात आले.