- सांगली : ड्रग्ज आणि मनी लॉड्रिंग प्रकरणात अडकल्याचा कांगावा करीत सांगली येथील एका व्यापाऱ्यास दोघा भामट्यांनी तब्बल २ कोटी २५ लाख २ हजार १३३ रुपयांना गंडा घातला. डिजिटल अरेस्टचा हा प्रकार असल्याचेच निष्पन्न होत असून, अज्ञात दोघांविरोधात सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अभिनंदन सुभाष निलाखे (रा. अथर्व बंगला, वसंतनगर, सांगली) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी निलाखे हे व्यावसायिक आहेत. त्यांना शनिवार, दि. २६ मे २०२४ रोजी दुपारी २:१५ च्या सुमारास विक्रम शर्मा या व्यक्तीचा फोन आला. त्यानंतर लागोपाठ अन्य दोन क्रमांकांवरून त्यांना फोन आले. संबंधित भामट्यांनी फिर्यादी अभिनंदन निलाखे यांना तुमचा फोन काही वेळात बंद होणार असल्याचे सांगितले. तसेच, निलाखे यांना, तुमचे आधारकार्ड हे ड्रग्ज आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात वापरले आहे. तुमच्यावर मोठा गुन्हा दाखल झाला आहे.
तुरुंगवासाची दाखविली भिती
तुमचा फोन जम्मू-काश्मीर येथे अॅक्टिव्ह असून, तुम्हाला अटक होऊन तुरुंगवास होऊ शकतो, असे सांगितले. हा प्रकार मार्च ते जून-२०२४ या कालावधीत घडला. अटक टाळण्यासाठी फिर्यादी निलाखे यांनी भामट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर तब्बल २ कोटी २५ लाख २ हजार १३३ रुपये त्यांना आयसीआयसी बैंक शाखेच्या माध्यमातून पाठविले, परंतु कालांतराने निलाखे यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले.