मानवतेचा दीप लावू! 

0
7

आपण वर्षभर विविध सण साजरे करतो, त्यात दिवाळी सणाला विशेष महत्व आहे कारण दिवाळी हा असा एकमेव सण आहे जो आपण पाच दिवस साजरा करतो. आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगात दिवाळी उत्साहात साजरी केली जाते म्हणूनच दिवाळीला सणांचा राजा म्हणतात. दिवाळी सारखा उत्साह इतर कोणत्याच सणात नसतो. दिवाळीत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्याच उत्साहाला  उधाण येते म्हणूनच गरीब असो वा श्रीमंत, राज महालात राहणारा असो वा झोपडीत राहणारा प्रत्येक जण दिवाळी सण साजरा करतो. लहान मुलांसाठी तर दिवाळी म्हणजे पर्वणीच असते. शाळेला सुट्टी, नवे कपडे, नव्या वस्तू, किल्ला बनवणे, फटाके उडवणे, मिठाई, फराळ,  मामाच्या गावाला जाणे  अशा सर्व आवडत्या गोष्टी फक्त दिवाळीत करता येतात. दिवाळी म्हणजे लहान मुलांची चंगळ. केवळ लहान ममुलेच नाही तर भावा – बहिणींचा देखील हा आवडता सण कारण दिवाळीतच भाऊबीज हा बहीण – भावांचा आवडता सण येतो. सासरी असलेली बहीण भावाला  ओवळण्यासाठी दिवाळीत आवर्जून माहेरी येते. दिवाळी हा आबालवृद्धांचा आवडता सण. 

दिवाळी सण म्हणजे प्रकाशाचा सण, दिव्यांचा सण. दिवाळीच्या पाच दिवसांच्या काळात आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, नवी खरेदी, नव्या वस्तू, नवे कपडे, फटाके यांची रेलचेल. आताही या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. २०२० आणि २०२१ या दोन वर्षात कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला होता त्यामुळे या दोन वर्षात लोकांना मनासारखी दिवाळी साजरी करता आली नव्हती.  कोरोनामुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला  त्यामुळे अनेकांनी साधेपणाने दिवाळी साजरी केली होती.  सुदैवाने यावेळी दिवाळीवर कशाचेही सावट नसल्याने  लोकांना दिवाळी मनासारखी साजरी करता येणार आहे.  त्यामुळे लोकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. या वर्षी महागाई वाढली असली तरी दिवाळीचा उत्साह कमी झालेला नाही उलट वाढलाच आहे. हा उत्साह पुढे देखील असाच कायम राहणार आहे कारण दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा,  प्रसन्नतेचा उत्सव आहे. 

 

दिवाळी म्हणजे आनंदाचा दीपोत्सव…..! 

Diwali, also known as the Festival of Lights, is a celebration of brightness and divinity. During the five-day period of Diwali, the sky becomes adorned with fireworks, lamps, rangoli, and there is a hustle-bustle of new purchases and fresh clothing. Even in the years 2020 and 2021, which were heavily affected by the pandemic, people managed to celebrate Diwali with enthusiasm, despite the loss of employment for many. The excitement for Diwali remains undiminished, and this year, despite the rise in prices, the festive spirit continues to grow. Diwali is a festival of joy, enthusiasm, and happiness, and its celebration will continue to bring delight and exuberance in the future.

     

बाहेर प्रकाशाचे दिवे पेटवायचे आणि हृदयातून ज्ञानाचे दिवे प्रज्वलित करायचे. अंतःकरणात अज्ञानाचा, विषमतेचा, अहंकाराचा अंधार असेल तर तो दूर करायच. ज्या प्रमाणे आकाशकंदील, पणत्या लावून बाहेरील अंधार दूर करण्याचा संदेश दिवाळी देते तसेच आपल्या अंतःकरणात असलेल्या अवगुणांचा अंधार दूर करण्याचा संदेश दिवाळी देते. प्रत्येक मनुष्याने शुभ चिंतन करून, शुभ विचार मनात आणून, शुभ विचार प्रकट करून जीवन प्रगल्भ आणि समृद्ध करावे हाच संदेश दिवाळी देते. 

 

जीवनातून आसुरी शक्तीचा पराभव करण्यासाठी दैवी शक्तीचा वापर करावा. मानवाची सर्व धडपड जीवनात सुख आणि आनंद मिळवण्यासाठीच चाललेली असते. दुःख भोगल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही हे तत्वज्ञान सांगण्यासाठी ठीक;  मात्र दुःखाची अनुभूती घेण्यास कोणालाही आवडत नाही. मनुष्य स्वभावातील हा स्थायीभाव ओळखूनच भारतीय संस्कृतीत सणांची निर्मिती केलेली असावी याचे भान ठेवूनच प्रत्येकाने सण साजरे करावेत. 

       

गरीब,कष्टी, दीन, दुबळे, वंचित असा मोठा दुःखी वर्ग समाजात आहे. आपल्या घरी दिवाळी साजरी करताना त्यांच्याही घरी आनंदाचा एक दिवा लावावा म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंदाची रेषा पसरेल. या दुःखी,  कष्टी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य पसरवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्यच आहे. साने गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे बाहेर अनंत दिवे पाजळून दिवाळी येत नसते. हृदयात प्रेमाच्या, मानवतेच्या पणत्या लावून आनंदाची उधळण करणाऱ्या या सणातून आपल्या जीवनात प्रकाश आणू या! अशी दिवाळी साजरी झाली तरच खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली असे म्हणता येईल अन्यथा नाही!

     

चला तर मग दीन दुबळ्यांचे दुःख वाटून घेऊ, मानवतेचा ओलावा देऊ, त्यांच्या पाठीवर प्रेमाचा हात फिरवू, त्यांच्या जीवनात सौख्य निर्माण करू. आपल्या ताटातील खाणे याला प्रवृत्ती म्हणतात, दुसऱ्याच्या ताटातील ओरबाडणे याला विकृती म्हणतात तर आपल्या ताटातील दुसऱ्याला देणे याला संस्कृती म्हणतात. चला तर मग आपण या दिवाळीच्या निमित्ताने आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करू.

श्याम ठाणेदार,दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here