दोन विद्यमान आमदारांत ‘काटे की टक्कर’ | कोणाची शिष्टाई कामी येणार,कोन घेणार माघार ? | जतमध्ये काय आहे स्थिती

0
315

जत : सांगली जिल्ह्यातच नव्हे तर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कायम चर्चेतील मतदारसंघ म्हणून जत मतदारसंघ ओळखला जातो. यंदाही विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत विरुद्ध विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आमनेसामने आखाड्यात उतरल्याने रंगत वाढली आहे. जतच्या राजकीय पटलावर भूमिपुत्र विरुद्ध विकासपुत्र असा सामना जरी सध्या रंगला असला तरी महाविकास आघाडी व महायुतीतुन इच्छुक असलेल्या नेत्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन्ही विद्यमान आमदार व बंडखोरीमुळे जतमधील लढत हाय होल्टेज होण्याची चिन्हे आहेत.

आ.विक्रमसिंह सावंत अर्थात काँग्रेसने कासवगतीने विधानसभेची निवडणूक शर्यत जिंकण्याची व्यूहरचना आखलेली असताना त्याला खो घालण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे नेते सुरेश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.भाजपमधील इच्छुकांची गर्दी त्यात आ.गोपीचंद पडळकर यांची फिक्स एन्ट्री झाल्याने नाराज इच्छुक माजी आमदार विलासराव जगताप, तम्मणगौडा रवि पाटील, प्रकाश जमदाडे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे.विलासराव जगताप यांनी स्वाभिमानी कार्यकर्त्यांची मोट बांधली असून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणारच अशी आक्रमक भूमिका घेतलेल्या तम्मणगौडा रविपाटील यांना बळ देण्याचे जाहीर केले आहे.जतच्या राजकारणात स्वतःचा जमदाडे गट सक्रिय करण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत.

बंडखोरी करायची की भाजप, काँग्रेस किंवा अपक्षाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय गटनिहाय बैठकीनंतर जाहीर करणार असल्याचे संचालक जमदाडे यांनी जाहीर केल्याने त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.रिपाई आठवले गट ही भाजपवर नाराज आहे.दहा वर्षात भाजपने रिपाइंची मते घेतली पण त्यांना सन्मान दिला नसल्याचे सांगत संजय कांबळे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांनाही तालुक्यात मानणारा वर्ग आहे. भाजप गोटातील नाराजी दूर करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आ.सदाभाऊ खोत यांच्यासह वरिष्ठ नेते प्रयत्नशील असले तरी त्यांच्या हाती काही लागलेले नाही.

तम्मणगौडा रवि पाटील व प्रकाश जमदाडे यांची मनधरणी भाजपकडून सुरूच आहे.खा.विशाल पाटील यांनी संचालक जमदाडे यांना काँग्रेसची ऑफर देत आ.सावंत यांना साथ देण्याचे आवाहन केले असले तरी त्यांनी भाजप बरोबरच कॉंग्रेसलाही वेट अँड वाँच असाच निरोप दिला आहे. भाजपपुढे बंडखोरी थोपविण्याचे तर, काँग्रेसला मित्र पक्षाला सोबत घेवून जाण्याचे आव्हान आहे. तालुक्यात सध्या विकासाचा मुद्दा गुल होत भूमीपुत्र विरुद्ध बाहेरचा उमेदवार हाच मुद्दा गाजताना दिसतोय.

उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपने रेकॉर्डब्रेक तर,काँग्रेसने विशाल शक्तीप्रदर्शन केल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप व काँग्रेसने विजयासाठी बेरजेचे गणित सुरू केलेले असताना अपक्ष उमेदवारांनीही आकडेमोड जुळविण्यास सुरुवात केली आहे.

माघारी घेणार कोण?

जत विधानसभेसाठी महाविकास आघाडीतून आ.विक्रमसिंह सावंत, महायुतीतून आ.गोपीचंद पडळकर, बसपातून विक्रम ढोणे, हिंदुस्थान जनता पक्षातून सतीश कदम तर, बंडाचा झेंडा हाती घेत भाजपमधून इच्छुक असलेले जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, माजी शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रविपाटील,शंकर वगरे, रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजय कांबळे, महादेव हुचगोड, महाविकास आघाडीतून इच्छुक असलेले शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिदे, रासपचे तालुका उपाध्यश्व लक्ष्मण पुजारी यांच्याबरोबरच श्रीशैल उमराणी, विजय बागेळी, महादेव पवार, भिमगौडा बिराजदार, दत्तात्रय भुसनूर, अण्णासाो टेंगले असे १७ जणांचे अर्ज वैध ठरले असून येत्या चार तारखेला माधार कोण घेणार हे स्पष्ट झाल्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.जत विधानसभेसाठी बंडखोरी होण्याची चिन्हे अधिक आहेत.नेमके कोणाची शिष्टाई कामी येणार,कोण घेणार माघार याकडे‌ लक्ष लागले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here