सांगली : सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, उपाध्यक्षा जयश्री मदन पाटील यांच्यासह सहा विद्यमान संचालक आणि दोन माजी संचालक विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीच्या मैदानात कोण बाजी मारणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेला ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणून ओळखले जात आहे. या बँकेच्या माध्यमातून अनेक शेतकरी, पशुपालक आणि छोट्या- मोठ्या उद्योगाला उभारी मिळाली आहे. म्हणून जिल्ह्याचे राजकारण हे जिल्हा बँकेतूनच चालते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. हे जिल्हा बँकेचे संचालक नसले तरी बँकेवर त्यांचेच वर्चस्व आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदम हेही बँकेचे संचालक नाहीत. पण, बँकेत कुणाला पाठवायचे ते तेच ठरवत आहेत. म्हणून त्यांचाही बँकेशी थेट संबंध नसला तरी अप्रत्यक्ष संबंध आहेत. कदम यांना भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांनी आव्हान दिले आहे. देशमुख सध्या बँकेचे संचालक असून मागील संचालक मंडळात माजी उपाध्यक्ष ही होते.
शिराळा विधानसभा निवडणुकीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्याविरोधात बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी दंड थोपटले आहेत. या लढतीमध्ये कोण कुणाला भारी ठरणार, याकडे मतदारांसह जिल्ह्यातील बँकेच्या सभासदांचे लक्ष लागले आहे.
सांगली मतदारसंघात जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. याच मतदारसंघातून काँग्रेसकडून जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील निवडणूक लढवत आहेत. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ निवडणुकीच्या मैदानात असल्यामुळे तिरंगी लढत होत आहे.माजी खासदार आणि बँकेचे संचालक संजय पाटील लोकसभेच्या पराभवानंतर तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांचे पुतणे, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी संजय पाटील यांच्यासमोर आव्हान उभा केले आहे.