सांगली : विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपल्यानंतर जिल्ह्यातील आठही मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून, काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लबतीचे चित्र आहे. आता महायुती आणि महाविकास आघाडीसह अपक्षांनी विजयश्री खेचून आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी आता राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्टार प्रचारकांच्या सभांचे जिल्ह्यात आयोजन करण्यात आले आहे. अर्थात, दिग्गजांच्या सभा ८ नोव्हेंबरनंतरच होत आहेत.
सांगली जिल्ह्यात प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आदी येत आहेत.
अर्ज माघारीनंतर खऱ्या अथनि निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या आहेत.
निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहेगावागावांत जाऊन थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम उमेदवार करत आहेत. सभेला गर्दी जमवण्यासाठी स्टार प्रचारकांची उपस्थिती महत्त्वाची असल्यामुळे त्यासाठी जिल्ह्यातील नेतेमंडळींनी नियोजन केले आहे. भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सांगलीत सभेचे नियोजन करण्यात आले आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची १० तारखेनंतर जतमध्ये सभा घेण्यात येणार आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची संख (ता. जत) येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा होत आहे. जत तालुक्यातच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मंत्री एम. बी. पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.याचबरोबर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार प्रणिती शिंदे, माजीमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आदींच्या जिल्ह्यात सभा होत आहेत.
महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विनोद तावडे आदी येत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याही सभा होत आहेत. मनसेच्या प्रचारासाठी प्रकाश महाजन यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, संजय राऊत, भास्कर जाधव यांच्या सभा होत आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांची इस्लामपूर, सांगली आणि मिरज येथे सभा घेण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.