पक्षातील बंडोबांना थंड करताना सर्वच वरिष्ठ नेत्यांना कसरती कराव्या लागल्या. विशेषतः भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांचा कस लागला. बंडोबांनी माघार घ्यावी यासाठी काय काय आश्वासने द्यावी लागली, हे नेत्यांनाच माहिती. कोणाला महामंडळाचा अध्यक्ष करतो म्हणाले, तर कोणाला पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची हमी दिली.
कोणाला थेट विधानपरिषदेत आमदारकीची स्वप्ने दाखवली, तर कोणाच्या साखर कारखान्याला मदतीची लालूच दाखविली. काही बंडोबांनी थेट अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचाच शब्द मागितला. हट्टी पोराला आई-बापाने मनाला येतील ती आश्वासने देऊन त्याचे रडणे थांबवावे असाच काहीसा हा प्रकार होता.
निवडणूक झाल्यावर आपला पक्ष सत्तेवर येईल की नाही याची तमा न बाळगता नेत्यांनी आश्वासनांची खैरात केली. एका बंडोबाला यावर छेडले, तेव्हा तो म्हणाला, ‘साहेबांनी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपद देण्याचे आश्वासन दिले आहे. आमदार झालो नाही, तरी पक्षाचा नेता म्हणून रिमोट माझ्याकडेच राहणार आहे. ‘पक्ष सत्तेत आला नाही, तर या पदाचा उपयोग काय?’ या प्रश्नावर मात्र बंडोबाचा चेहरा पाहण्यासारखा झाला!