लोकसभेला गुण्या-गोविंदाने नांदणारे काँग्रेसचे कार्यकर्ते सांगलीच्या विधानसभा निवडणुकीत विभागले गेलेत. काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केल्याने काँग्रेस दोन गटांत विभागली गेली आहे. केवळ विभागणीच झाली नाही, तर मनभेद, मतभेदांच्या सीमा पार करण्याची तयारी चालविली आहे. ताई अन् बाबांच्या राजकीय लढाईत कार्यकर्त्यांनी व्यक्तिगत पातळीवर वादाच्या तलवारी उपसल्या आहेत. एकमेकांची लायकी काढण्यापर्यंत वाद विकोपाला गेले आहेत. समाज माध्यमांवरील काँग्रेसकडून काँग्रेसचे होत असलेले वस्त्रहरण प्रथमच घडल्याने दोन्ही गटांपेक्षा पक्षावर प्रेम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी गांधारीची भूमिका घेणे पसंत केले आहे. काँग्रेसचे हे महाभारत संपूर्ण राज्यभर आता चर्चेत आले आहे.
काँग्रेसच्या राजकारणात मिरजेचा बळी?
काँग्रेसने हक्काचा मिरज मतदारसंघ उद्धवसेनेला सोडून दिल्याने चर्चेला ऊत आला आहे. याला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमधील अंतर्गत राजकारण कारणीभूत असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या वाटाघाटींमध्ये काँग्रेसने काही जागा आपल्याकडे हट्टाने मागून घेतल्या. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जागांचा समावेश आहे. जागा मिळविण्यात काँग्रेसचे कोल्हापुरातील नेते वरचढ झाल्यास उद्या सत्तावाटपातही माघार घ्यावी लागेल, अशी भीती उद्धवसेनेच्या काही नेत्यांना होती. त्यातूनच त्यांनी मिरजेची जागा इरेला पडून मागून घेतल्याची चर्चा आहे. मिरजेच्या जागेसाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे काही नेते आग्रही होते. पण, त्यांना कोल्हापुरातील काँग्रेसच्या नेत्यांनी साथ व पाठबळ दिली नसल्याची चर्चा आहे.
विशालदादा, तुम्ही काय म्हणाला होतात?
‘काँग्रेसमध्ये कोणालाही उमेदवारी दिली तर बंडखोरी करणार नाही’. अशी भूमिका लोकसभा निवडणुकीवेळी विशाल पाटील यांनी केली होती.भूमिकेची तुलना केली जात आहे. काँग्रेसला सांगली विधानसभेची जागा मिळून अधिकृत उमेदवारी काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्याला दिली असताना विशाल पाटील बंडखोरीला रसद का पुरवित आहेत, असा सवाल पृथ्वीराज पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे. त्यामुळे काँग्रेस अंतर्गत वादाचे ग्रहण सुटण्यास तयार नाही. माझी लढाई काँग्रेसच्या अस्तित्वासाठी आहे, व्यक्तिगत नाही. पक्ष टिकला पाहिजे यासाठी लढाई असल्याची त्यांनी व्यक्त केलेली मते त्यांच्यासमोर मांडून विधानसभेतील भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.