मोरबगी (ता. जत) येथील विवाहिता अंबिका सदाशिव मडसनाळ (वय १९) हिचा गळा दाबून खून केल्याच्या शवविच्छेदन अहवालानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमदी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संजीव भाऊसाहेब जाधव यांनी या खुनाची तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मृत अंबिकाचा भाऊ सिध्दाप्पा ईश्वर खवटगी (रा. इटगनाळ ता. तिकोटा जि. विजापूर) व आजोबा चंद्रकांत निलंजगी (रा. अमृतवाडी, ता. जत) यांनी, आंबिका हिच्या खुनाची घटना २४ ऑक्टोबर रोजी घडली, अशी तक्रार पोलिसात दिली होती.
या तक्रारीत अंबिकाचा खून करून गळफास लावल्याचा बनाव केला आहे. दरम्यान शवविच्छेदन अहवालात खून झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल करून घेतला नाही. असे तक्रारीत म्हटले होते. अखेर बुधवारी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबिका मडसनाळ हिच्या मृत्यूच्या चौकशीअंती व वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर अज्ञाताने राहत्या घरी दोरीने गळा आवळून अंबिका हिचा खून केल्याबाबत उमदी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.