वृद्ध दाम्पत्याच्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे.भाऊबीजेच्या दिवशीच जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने डोक्यात लाकडी दांडका मारून आपल्या बहिणीसह मेहुण्यास यमसदनी धाडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितास बेड्या ठोकल्या आहेत. बहिणीस मूलबाळ नसल्याने तिने वडिलोपार्जित जमिनीतील हक्कसोड करावा आणि तिच्या पतीच्या नावे असलेली जमीनही आपल्या नावावर करावी, या वादातून हत्याकांड घडल्याची माहिती अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी दिली.
मिरखेलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ सावळीराम बेंडकोळी (वय ५०, रा. लाडची शिवार, ता. जि. नाशिक) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. माळरानातील शेतवस्तीवर राहणाऱ्या चंद्रभागा रामू पारधी (वय ६५) व रामू राधो पारधी (वय ७०) या दाम्पत्याचा बुधवारी (दि. ६) सकाळच्या सुमारास मृतदेह आढळून आला होता. दोघांचा आकस्मिक मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असताना स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळविल्याने या घटनेचा उलगडा झाला.
शवविच्छेदनात दोघांच्या छातीत व पोटावर मारहाण करण्यात आल्याचे पुढे आल्याने याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिस्खेलकर, उपविभागीय अधिकारी हरीश खेडकर आदींनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पोलिसांनी संशयिताचा माग काढून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
आक्रोश करणाराच निघाला खुनी
सर्वत्र शोध घेऊनही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या दाम्पत्याचे कुणाशीही वैर नसल्याचे, तसेच त्यांना मूलबाळ नसल्याचे वास्तव समोर आल्याने पोलीस तपास थंडावला होता. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने परिसरात तळ ठोकून परिसर पिंजून काढत या घटनेचा उलगडा केला आहे. बहीण व मेहुण्याच्या मृत्यूनंतर दुःखाचा डोंगर कोसळल्याचा आव आणणाऱ्या मृत महिलेच्या सख्ख्या भावानेच हत्याकांड केल्याचे समोर आल्यामुळे संशयितास बेड्या ठोकण्यात आल्या.
लाडची शिवारात संशयित बेंडकोळी यांची वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीवर अन्य बहिणींसमवेत चंद्रभागाबाईनेही वाटा मिळावा, अशी मागणी केली होती. त्यातून दोघा भाऊ बहिणीत वेळोवेळी वाद झाले होते. वडिलोपार्जित जमिनीतील हक्कसोड करून दे आणि तुला मूलबाळ नसल्याने तुझ्या पतीच्या नावे असलेली साडगाव येथील जमीनही माझ्या नावावर कर, अशी मागणी करीत संशयित नेहमी वाद घालत असे.
रानमाळावर घेतले प्राण
• भाऊबीजेच्या दिवशी रविवारी (दि.३) सायंकाळी संशयित नेहमीप्रमाणे आपल्या बहिणीच्या घरी गेला होता. भावाच्या पाहुणचाराचा बेत आखला जात असताना तुम्हाला मूलबाळ नाही. अडीअडचणीत मीच कामात येतो, जमीन का सोबत घेऊन जाणार आहात का? असे म्हणत संशयिताने पुन्हा बहीण मेहुण्याशी वाद घातला. नकार मिळताच मेहुण्याची जमीन नावावर करून घेतल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत संशयिताने वयोवृद्ध बहीण व मेहुण्यास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. रानमाळावर ही घटना घडल्याने पारधी दाम्पत्याच्या मदतीला कोणीही आले नाही. या घटनेनंतर संशयित आपल्या घरी निघून गेला. विव्हळत पडलेल्या दाम्पत्याचा पोटात वर्मी मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेच्या तिसऱ्या दिवशी दिवाळीनंतर शेतावर परतलेल्या शेजाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली. एकाच्या मृत्यूनंतर विरहाच्या धक्क्याने दुसऱ्यानेही प्राण सोडल्याचे बोलले गेले.
शवविच्छेदनातून खुनाचा प्रकार उघड
• नातेवाईकांकडून अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आल्याने तालुका पोलिसांनी घटनास्थळ गाठून पारधी दाम्पत्याचे शवविच्छेदन केले. यात दोघांच्या खुनाचा प्रकार समोर आल्याने स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पाळत ठेवून संशयितास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता या गुन्ह्याचा उलगडा झाला. उलट तपासणीत संशयिताने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती मिरखेलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही कारवाई सहायक निरीक्षक संदेश पवार, जमादार नवनाथ सानप, शिवाजी ठोंबरे, हवालदार संदीप नागपुरे, मेघराज जाधव, सचिन देसले, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, रवींद्र गवळी आदींच्या पथकाने केली.