जमीन नावावर का करून देत नाही म्हणून मुलानेच केला आईचा खून

0
140

मंगळवेढा तालुक्यातील चिक्कलगी येथील आईच्या नावावर असलेली शेतजमीन नावावर का करुन देत नाही. तसेच खर्चासाठी पैसे का देत नाही या कारणावरुन मुलाने आईच्या मानेचे हाड मोडून गंभीर जखमी करून तिला जिवे ठार केल्याप्रकरणी मुलगा चनप्पा उर्फ चनगोंडा हत्ताळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

तंग्याव्वा – गुरुसिध्दप्पा हत्ताळी असे आईचे नाव असून फिर्याद संशयित आरोपीचा मामा धुंडाप्पा मल्लाण्णा चौगुले (वय ६५, रा. जंगलगी) यांनी दिली आहे. ही खुनाची घटना दि.१४ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ७:३० वाजण्याच्या पूर्वी घडली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर १५ नोव्हेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी धुंडाप्पा मल्लाण्णा चौगुले हे मयताचा भाऊ व संशयित आरोपीचा मामा असून जंगलगी इथे राहावयास आहेत. दि.१४ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास घरी असताना त्यांना पुतण्या पुतण्या मल्लाप्पा मलकारी चौगुले याने आत्या तंग्याव्वा हि चिखलगी येथे मयत झाल्याचे सांगितल्यानंतर फिर्यादी चिक्कलगी या गावी गेले, तेथे आगोदरच त्यांचे दोन्ही भाऊ मलकारी, चंद्राम व इतर आजुबाजूचे लोक तेथे जमा झालेले होते. फिर्यादीची बहिण तंग्याव्वा हिस राहते घरात भिंतीला टेकवून बसविले होते. त्यावेळी फिर्यादीला मेव्हणा गुरसिध्दप्पा व भाचा चनप्पा उर्फ चनगोंडा यांनी बहिण तंग्याव्वा हिस अटॅकने मयत झालेचे सांगितले, तर त्यावेळी तेथे आलेले इतर नातेवाईक यांना भाचा चनप्पा उर्फ चनगोंडा याने बहिण तंग्याव्वा ही विहीरीत पडून मयत झाल्याचे सांगितले.

असता भाचा चनप्पा उर्फ चनगोंडा दिशाभूल करीत असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आल्याने, पोलिसांना कळवा असे म्हणालेवर भाचा चनप्पा उर्फ चनगोंडा याने दि.१५ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री दि.१ वाजता मंगळवेढा पोलीस ठाण्यास खबर दिली, पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर तेथील डॉक्टर यांनी फिर्यादीची बहिण तंग्याव्वा हिचे मानेचे हाड मोडल्याने ती मयत झाल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने प्रेत ताब्यात घेवून चिक्कलगी या गावी अंत्यविधी केला, फिर्यादीची बहिण तंग्याव्वा हिस तिचा मुलगा चनप्पा उर्फ चनगोंडा हा सुमारे तीन वर्षापासून तिचे व तिचे पतीचे नावावर असलेली शेती जमीन नावावर करुन देत नाही व खर्चासाठी मला पैसे का देत नाही याकारणावरुन शिविगाळी करुन मारहाण करीत असल्याने त्यास यापूर्वी बऱ्याच वेळा समजावून सांगितलेले होते.

 दोन दिवसापूर्वी फिर्यादी बहिण तंग्याव्वा भेटण्यास गेल्यावर तिने मुलगा चनप्पा उर्फ चनगोंडा हा जमीन नावावर न केल्याने पैसे न दिल्याने शिविगाळी करुन मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले होते. यावरुन फिर्यादीची खात्री झाल्यानंतर बहिण तंग्याव्वा हिला अटॅकने किंवा पाण्यात बुडून मयत झाली नसून तिला भाचा चनप्पा उर्फ चनगोंडा याने तिला कशाने तरी मारहाण करुन तिस जिवे ठार मारले व बहिण तंग्याव्वा हि अटॅकने व पाण्यात पडुन बुडून मयत झाली आहे असे सांगून दिशाभूल करुन बनाव रचल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश ढवाण करीत आहेत.

मामाला अटॅकमुळे तर इतर नातेवाईकांना विहिरीत बुडून मयत झाल्याचा बनाव रचला होता. मामाला संशय आल्यामुळे मामाने भाच्याला पोलिसांना खबर देण्यासाठी सांगितले असता, भाच्याने पोलीस ठाण्यात खबर दिली होती, मात्र या घटनेत भाचाच आरोपी निघाला असून शवविच्छेदन केले नसते तर हा गुन्हा ओळखीस आला नसता. त्यामुळे पोलिसांनी खबर घेत असताना घटनेचे गांभीर्य लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here