संजय पाटील यांचा रोहित पाटलांना इशारा : कवठेमहांकाळ येथील सभेत अरेतुरे करत हल्लाबोल
गुणी बाळ बेताल वक्तव्य करत आहे. त्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते बेभान झालं आहे. पण तू ज्या बापाच्या प्रतिमेवर मतं मागायला फिरत आहेस ना त्या बापाचा इतिहास काढायला लावू नकोस. औकातीत रहा. कुवतीत रहा. मी ज्यावेळी तुमचं काढायला सुरू करेन तेव्हा रस्त्याने मान वर करून फिरता येणार नाही, अशा शब्दात अरेतुरे करत संजय पाटील यांनी रोहित पाटलांवर हल्ला चढवला.
कवठेमहांकाळ येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, पांडुरंग पाटील, प्रमोद शेंडगे, राजवर्धन घोरपडे, प्रभाकर पाटील, अर्जुन कर्पे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत संजय पाटील यांनी रोहित पाटील यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. अतिशय जहरी शब्दात हल्ला चढवत त्यांनी स्व. आर. आर. पाटील, सुरेश पाटील, रोहित पाटील यांच्या कारभारावर बोट ठेवले.
सभेत संजय पाटील म्हणाले, आर. आर. पाटील माझ्या चुलत्या विषयी बोलताना म्हणत होते की, यांच्या जनावराचा गोठा आहे तसे आमचे रहायला घरी नाही. यापुढील काळात माझ्या घरातील कोणीही आमदार होणार नाही. तर एखाद्या झोपडीतील आमदार होईल. आर. आर. पाटील मतदारसंघात अशी भावनिक भाषणे ठोकत होते.
मात्र या निवडणुकीत तासगाव येथे रोहित पाटील यांनी पैसे वाटप केले. या पैशाचा पुरवठा कोण करत आहे. तुमची इस्टेट कुठे आहे. कोणाच्या नावावर जमिनी आहेत. कोण पोपटराव खरमाटे नावाचा ठेकेदार आपणास मदत करतो. कोणाची ईडी चौकशी झाली. 'आदर्श'मध्ये कोणाचा फ्लॅट आहे. शेखर गायकवाड कोण आहेत, हे ज्यावेळी मी सांगायला सुरुवात करेन त्यावेळी तुम्हाला रस्त्यावरून मान वर करून फिरता येणार नाही. त्यामुळे औकातीत रहा. कुवतित रहा.
ते म्हणाले, लोकांना भावनिक साद घालायचा भुलभुलय्या बंद करा. 35 वर्षात तुम्ही काय केले. एक तरी काम केले का, हे मतदारांना सांगावे. मतदार संघात एकही संस्था आपणास उभी करता आली नाही. सूतगिरणी होती तीही बंद पडली. विरोधी गटातील माणसं लोकांना फसवून मते घेत आहेत. आमदार होत आहेत. स्वतःचा प्रपंचा उभा करत आहेत. आर. आर. पाटील यांच्याकडे अनेक वर्षे कॅबिनेट मंत्रीपद होते. गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री अशी महत्त्वाची पदे त्यांच्याकडे होती. मात्र त्यांनी गृहमंत्री पदाच्या काळात एकाही युवकाला पोलिसात भरती केले नाही.
बाळासाहेब देसाई नावाचे एक लोकनेते होते. तेही गृहमंत्री होते. त्यांनी हजारो युवकांना पोलिसात नोकरी लावली. शेजारील पतंगराव कदम यांच्या मतदारसंघात एमआयडीसी, बँक, कारखाना, मेडिकल कॉलेज अशी प्रचंड कामे झाली आहेत. जयंत पाटील यांच्या मतदारसंघातही प्रचंड प्रमाणात कामे झाली आहेत. तासगाव - कवठेमंकाळमध्ये आर. आर. पाटील यांनी काय केले, असाही खडा सवाल संजय पाटील यांनी यावेळी केला.
ते म्हणाले, महांकाली साखर कारखान्याची काय अवस्था केली आहे. हा कारखाना अडचणीत आणण्यात सुरेश पाटील यांचा हात आहे. त्यांनी चाललेले चाक थांबवलं. आणि आता मदत करतो म्हणून सांगत आहेत. हा कारखाना चालू करायचा असेल, ऊस नीट घालवायचा असेल तर अजितराव घोरपडे व मला मदत करणे गरजेचे आहे. दुसऱ्यांच्या संस्था ताब्यात घ्यायला आम्ही कमजोर नाही, असेही पाटील यावेळी म्हणाले.
ते म्हणाले, खासदारकीच्या काळात मी कोट्यावधी रुपयांची कामे जिल्ह्यात केली. टेंभू, म्हैशाळ या योजनांना मोठ्या प्रमाणावर निधी आणला. मात्र माझ्यावर सातत्याने गुंडगिरीचा आरोप केला जातो. एखाद्या कार्यकर्त्यावर जर अन्याय, आघात होत असेल तर त्याला संरक्षण द्यायचे नाही का. त्याच्या पाठीशी उभे राहायचे नाही का. असं केलं तर मी गुंडगिरी केली, असा त्याचा अर्थ होतो का, असाही सवाल पाटील यांनी शेवटी केला.
ओंबासे, मोहिते या पोलीस अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये गोळा केले : संजय पाटील
यावेळी संजय पाटील म्हणाले, कवठेमहांकाळ येथे आर. आर. पाटील यांनी ओंबासे व मोहिते नावाचे पोलीस अधिकारी आणले होते. या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये गोळा केले. त्यांचे काम, उद्योग काय होते? लोकांच्या नरड्याला नख लावून करोडो रुपये त्यांनी गोळा केले. लोकांना अडचणीत आणून त्यांच्याकडून पैसे घेतले. सामान्य जनतेला नागवण्याची भूमिका घेतली. अशा अधिकाऱ्यांना आणून आर. आर. पाटील यांनीच दहशत करण्याचा प्रयत्न केला, असा खळबळजनक आरोप पाटील यांनी या सभेत केला.