दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला : बंडखोरांच्या कामगिरीकडे लक्ष
सांगली : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी होत आहे. या निवडणुकीत जिल्ह्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाविकास आघाडी विरुध्द महायुती यांच्यात दुरंगी सामना असला तरी जत, खानापूर आटपाडी व सांगलीत बंडखोर अपक्ष उमेदवारांनीही चांगलेच आव्हान निर्माण केले होते. त्यांच्या कामगिरीकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष आहे.
सांगली जिल्ह्यातील सर्व आठही विधानसभा मतदारसंघात अतिशय अटीतटीच्या लढती झाल्या आहेत. जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व असून आठ पैकी दोन मतदारसंघात काँग्रेस, तीनमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, दोन मध्ये भाजपचे आमदार आहेत. एका मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे अनिल बाबर होते. त्यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त आहे. या सर्व मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत जोरदार लढत झाली.
महाविकास आघाडी विरुध्द महायुती असा सामना झाला. या निवडणुकीत पालकमंत्री सुरेश खाडे, राष्ट्रवादी शहर पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मानसिंगराव नाईक, कॉग्रेसचे नेते माजी मंत्री विश्वजित कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, सुधीर गाडगीळ या विद्यमान आमदारांसह माजी खासदार संजय पाटील, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख संग्रामसिंह देशमुख, निशिकांत पाटील, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील, रोहित पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सांगली, जत, तासगाव-कवठे महांकाळ हाय होल्टेज
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी सांगली, जत व तासगाव-कवठेमहांकाळ या तीन मतदारसंघात हाय होल्टेज लढत आहे. त्यामुळे येथील निवडणूक निकाल काय लागणार याकडे राज्याचे लक्ष आहे. सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याने भाजप पुन्हा येणार की परिवर्तन होणार याकडे लक्ष आहे.
तर जतमध्येही भाजपमध्ये बंडखोरी झाल्याने काँग्रेस जागा राखणार का ? याची उत्सुकता आहे. तासगाव-कवठेमहांकाळ मध्ये लोकसभेला पराभूत झालेले माजी खासदार विधानसभेच्या मैदानात आहेत त्यांच्या विरोधात स्व. आर. आर. आबा पाटील यांचे पुत्र रोहित मैदानात आहेत.