तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांनी उच्चांकी मताधिक्याने विजय मिळवला. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी साथ देऊनही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी खासदार संजय पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. या विजयाने तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ आर. आर. पाटील यांचा बालेकिल्ला भक्कम असल्याचे स्पष्ट झाले. या विजयाने तासगाव कवठेमहांकाळला रोहित पर्वाची सुरुवात झाली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर नाट्यमय घडामोडी घडत गेल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित असतानाच ऐनवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपमधून प्रवेश केलेले संजय पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली. त्याचवेळी त्यांना अजितराव घोरपडे यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे अंजनी विरुद्ध चिंचणी अशी पारंपरिक लढत उभा राहिली. यामध्ये रोहित पाटील यांनी बाजी मारत नवा विक्रम नोंदविला आहे.