खानापूर विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेच्या ‘धनुष्यबाणा’ची हॅटट्रिक झाली असून, सलग शिंदे सेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास अनिलभाऊ बाबर यांनी ७८ हजार १८१ मताधिक्य मिळाल्याने खानापूर मतदारसंघावर तिसऱ्यांदा भगवा फडकविला आहे. खानापूर मतदारसंघातील आजपर्यंत झालेल्या विधानसभेच्या निवडणूक इतिहासात सर्वाधिक मताधिक्य बाबर यांना मिळाले.खानापूर विधानसभा मतदारसंघात सुहास बाबर यांनी विजय मिळविल्यानंतर शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अँड. वैभव सदाशिवराव पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले असून, आटपाडीची अस्मिता म्हणून रिंगणात उतरलेले शरद पवार गटाचे बंडखोर माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा करिश्मा फारसा चालला नसल्याचे दिसून येत आहे. खानापूर मतदारसंघात महायुतीतून शिंदे सेनेचे सुहास बाबर, महाविकास आघाडीचे वैभव पाटील तसेच अपक्ष राजेंद्र देशमुख यांच्यात तिरंगी लढत झाली.
दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र शिंदे सेनेचे उमेदवार सुहास बाबर यांनी पहिल्या फेरीपासून मताधिक्य घेण्यास सुरूवात केली. नागेवाडी गटातच त्यांना सर्वाधिक ७ हजार २७० मताधिक्य मिळाले. विटा शहरातच बाबर यांना जवळपास साडेचार हजारांचे मताधिक्य मिळाले. खानापूर मतदारसंघात समाविष्ट असलेल्या १४२ गावांपैकी केवळ तीन गावे वगळता सर्व गावांत सुहास बाबर यांना मताधिक्य मिळाले. राजेंद्र देशमुख यांना केवळ १३ हजार ९४७ मते मिळाली. आटपाडीत तानाजीराव पाटील यांनी बाबर यांच्यासाठी ताकद लावल्याने आटपाडी तालुक्यातच बाबर यांना सुमारे ३५ हजारांचे मताधिक्य मिळाले.