मिरज विधानसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपचे उमेदवार सुरेश खाडे यांनी ४५ हजार मताधिक्याने विजय मिळवत विजयाचा चौकार मारला. आतापर्यंत पाचव्यांदा आणि मिरजेत सलग चारवेळा विजय मिळविण्याचा विक्रम सुरेश खाडे यांनी केला आहे. सुरेश खाडे यांना १ लाख २८ हजार ०६८ व महाआघाडीचे तानाजी सातपुते यांना ८३ हजार ७८९ मते मिळाली.
मिरजेत शासकीय गोदामात मतमोजणी पार पडली. टपाली मतदानासह शहरी व ग्रामीण भागातील १६ फेऱ्यात सुरेश खाडे यांना मताधिक्य मिळाले. बाराव्या फेरीत मात्र तानाजी सातपुते यांनी सहा हजारांचे मताधिक्य मिळविले. प्रत्येक फेरीत मताधिक्य वाढत गेल्याने मतमोजणी केंद्राबाहेर व खाडे यांच्या कार्यालयासमोर महायुती कार्यकत्यांनी जल्लोष सुरू केला.
यावेळी ११ टक्के जादा मतदानामुळे बाजी कोण मारणार कमळ की मशाल याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती; मात्र मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून खाडे यांनी आघाडी घेतली. मिरजेतील ३ लाख ४७ हजार मतदारांपैकी २ लाख २७ हजार १८९ मतदारांनी ६६.०७ टक्के मतदान केले. गतवेळेस ५५.१७ टक्के मतदान झाले होते. यंदा ११ टक्के जास्त मतदानाचा फायदा खाडे यांनाच झाला आहे.
इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांचा सलग आठव्यांदा विजय
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सलग आठव्या विजयाची नोंद केली. मात्र यावेळी त्यांना अवघ्या १३ हजार २७ इतक्या मताधिक्यावर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी अत्यंत चिवट झुंज देताना जयंतरावांच्या बालेकिल्ल्यावर धडक मारू शकतो, असा संदेशही दिल्याचे स्पष्ट झाले. या निवडणुकीत इतर १० उमेदवारांची अनामत जप्त झाली.
आमदार जयंत पाटील यांच्या मुत्सद्देगिरीसमोर अनेक विरोधकांचे पानिपत झाले असताना निशिकांत पाटील यांनी दुसऱ्यावेळी अत्यंत ताकदीने त्यांच्याविरोधात उभे राहून एकच खळबळ उडवून दिली होती. एकतर्फी वाटणारी निवडणूक निशिकांत पाटील यांच्या उमेदवारीमुळे चुरस झाली. ५० हजारांपासून पुढे ८५ हजारांपर्यंत मताधिक्य घेण्याचा जयंत पाटील यांचा पायंडा यावेळी निशिकांत पाटील यांनी मोडीत काढला. त्यामुळे जयंत पाटील यांना तब्बल २१ फेऱ्यांच्या मोजणीनंतर १३ हजार २७ इतक्या मताधिक्यापर्यंत विजयासाठी खाली आणण्यात निशिकांत पाटील यशस्वी ठरले.जयंत पाटील यांनी तालुक्यातील विरोधकांची ताकद नेहमीच दुबळी राहील, अशा पद्धतीने आपल्या राजकारणाची वाटचाल ठेवली होती. प्रत्येक निवडणुकीत मतविभाजन होईल याची खबरदारी ते घेत होते. मात्र यावेळी त्यांनी असा कोणताही प्रयत्न न करता विरोधकांची ताकद जोखण्याचा डाव खेळला, त्यांच्या या खेळीमुळे इस्लामपूर मतदारसंघातील खरे राजकीय वास्तव समोर आले.