राजकीय तज्ज्ञांचे सर्व अंदाज फोल ठरवित भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सलग तीनवेळा निवडून येण्याचा नवा विक्रम सांगली विधानसभा मतदारसंघात नोंदविला. काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांचा त्यांनी ३६ हजार १३५ मतांनी पराभव केला. बंडखोरी करून आव्हान दिलेल्या काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांची अनामत रक्कम या निवडणुकीत जप्त झाली.
नाट्यमय घडामोडींमुळे सांगली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत अनेक विक्रम नोंदवित गाडगीळ यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला. विजयानंतर भाजप उमेदवार, नेते, कार्यकत्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, डीजेचा दणदणाट करीत सांगलीत भाजपच्या विजयाचा जल्लोष सुरू होता. सांगली मतदारसंघाची मतमोजणी येथील तरुण भारत क्रीडांगणावर पार पडली. टपाली मतमोजणीपासून अखेरच्या १६ व्या फेरीपर्यंत एका फेरीचा अपवाद वगळता गाडगीळ यांची आघाडी कायम राहिली. शहरी, ग्रामीण भागात गाडगीळ यांनी मताधिक्य मिळविले.