वाकड येथे लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये असलेल्या प्रेयसीची प्रियकराने हत्या करून अडीच वर्षांच्या मुलाला आळंदी येथे वारीत सोडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, या खुनामध्ये आरोपीची पत्नी आणि मेव्हणा सहभागी असून त्यांच्यासमोरच वादातून खून झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी शुक्रवारी (दि.
२९) दोघांना अटक केली. पल्लवी दिनेश ठोंबरे आणि मेव्हणा अविनाश टिळे अशी अटक आरोपींची नावे आहेत. यापूर्वी प्रियकर दिनेश ठोंबरे याला अटक करण्यात आली होती. जयश्री विनय मोरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
दिनेश ठोंबरे आणि खून झालेली जयश्री गेल्या पाच वर्षांपासून लिव्ह अॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांना अडीच वर्षाचा मुलगादेखील आहे. जयश्री गेल्या काही दिवसांपासून वेगळं राहायचा तगादा लावत होती. सतत पैशांची मागणी करत होती. जयश्रीला दिनेशच्या पत्नीसोबत भेटून बोलायचं म्हणत होती. अखेर २४ नोव्हेंबर रोजी म्हणजेच रविवारी रात्री नऊच्या सुमारास दिनेशची पत्नी पल्लवी आणि जयश्री अडीच वर्षीय मुलासह भूमकर चौकात भेटले. दरम्यान, भर रस्त्यावर जयश्रीने प्रियकर दिनेशशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद चारचाकी गाडीत बसून मिटवण्याचा दिनेशने प्रयत्न केला. परंतु, प्रेयसी जयश्री मोरे ही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. प्रियकर दिनेश ठोंबरे याने पत्नी आणि अडीच वर्षीय शिवसमोरच प्रेयसीच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केली.
मृतदेहाची विल्हे वाट लावण्यासाठी पत्नी पल्लवीने मेहुणा अविनाश टिळेला फोन करून बोलवून घेतलं. दिनेश आपल्या पत्नी, मेहूणा आणि अडीच वर्षीय शिवसह चारचाकी गाडीतून साताऱ्यातील खंबाटकी घाटात गेले. त्या ठिकाणी जयश्री मोरेचा मृतदेह फेकून देण्यात आला.
दुसऱ्या दिवशी २५ नोव्हेंबर रोजी अडीच वर्षीय शिवला आरोपी दिनेश ठोंबरे आणि पल्लवीने आळंदीतील कार्तिकी यात्रेत बेवारस सोडून दिले. त्यानंतर जयश्री मोरे ही बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दिली आणि ती बेपत्ता असल्याचा बनाव दिनेशने रचला. परंतु, काही तासांनीच जयश्री मोरेचा मृतदेह साताऱ्यातील पोलिसांना मिळाला आणि दिनेशचे बिंग फुटलं. वाकड पोलिसांना हे सर्व प्रकरण समजल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी दिनेश ठोंबरे यांच्यासह पत्नी पल्लवी ठोंबरे आणि मेव्हणा अविनाश टिळे याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.