तासगाव येथे भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले. भाजप किसान मोर्चाचे महामंत्री संदीप गिड्डे - पाटील यांच्या पुढाकाराने हे अभियान पार पडले. या अभियानांतर्गत आज दिवसभरात सुमारे 12 हजार 600 सदस्यांची नोंदणी करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीत थोडीशी पीछेहाट झाल्यानंतर राज्य व देशभरातील भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी पक्षाची पुनर्बांधनी सुरू केली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले. त्यानंतर आता पक्ष संघटन अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत पक्षाचे सदस्य नोंदविले जात आहेत. भाजप किसान मोर्चाचे महामंत्री संदीप गिड्डे - पाटील यांनी आज तासगाव येथे महा नोंदणी अभियान घेतले. भाजपाच्या अनेक जुन्या - नव्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरातून सुमारे 12 हजार 600 सदस्यांची नोंदणी करण्यात आली.
यावेळी संदीप गिड्डे - पाटील म्हणाले, पुढील काळात घर टू घर जाऊन सदस्य नोंदणी करणार आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे तर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे हात मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. देशभरात भाजप वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तासगाव - कवठेमहांकाळ मतदार संघातही येत्या काळात मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी केली जाईल.
ते म्हणाले, तासगाव - कवठेमहांकाळमधील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका भाजप ताकतीने लढणार आहे. राज्यभरात भाजपसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे तासगाव - कवठेमहांकाळमधील जुन्या - नव्या भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन मोट बांधली जाईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठीच आता गावागावात सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे.
यावेळी गोविंद सूर्यवंशी, इंद्रनील पाटील, महेश पाटील, नाना गोसावी, संदीप सावंत, शीतल पाटील यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.