जत : जत नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी व स्वच्छ शहर सुंदर शहर ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते लोखंडीपूल या जत-अथणी रस्त्यावरील ओढापात्राशेजारील अतिक्रमित खोक्यांच्या ठिकाणी शाॅपींग काॅम्प्लेक्सची उभारणी करावी,अशी मागणी शिवनेरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी केली आहे.
कुंभार म्हणाले की,जत नगरपरिषदेकडे उत्पन्न वाढीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी एक पर्याय म्हणजे जत शहरातून जाणाऱ्या जत अथणी रस्त्याच्या पूर्व बाजूस ओढापात्राशेजारील जागेत अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमणे करून खोकी घातली आहेत.या खोकीधारकांकडून जत नगरपरिषदेला कवडीचेही उत्पन्न मिळत नाही.उलट या अतिक्रमीत खोक्यांमुळे जत शहराचा विकास खुंटला आहे.तसेच खोक्यांमुळे शहराला विद्रुप स्वरूप प्राप्त झाले आहे.त्यातच ही सर्व खोकी ओढापात्रात असल्याने पावसाळ्यात ओढ्याला येणाऱ्या पाण्यापासून सुरक्षित नाहीत.
नगरपरिषदेच्या उत्पन्नात अधिक भर होण्यासाठी व स्वच्छ व सुंदर जत शहराची संकल्पना सत्यात या जागेवर नविन शाॅपींग काॅम्प्लेक्स चा प्लॅन तयार करून त्यामध्ये बी.ओ.टी.वर किंवा सरकारच्या कोणत्याही योजनेंतर्गत भरिव निधीची उपलब्धता करून घेऊन हे दुकानगाळे विविध व्यवसाईकांना भाडेकरारावर दिलेस अनेक व्यावसायिकांना व्यवसाय मिळेल व जत नगरपरिषदेच्या उत्पन्नात मोठी भर पडेल,असेही कुंभार म्हणाले.
जत-अथणी रोड असा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे.