खरचं अतिक्रमणे हटविणार काय ? | नागरिकांत औत्सुक्याचा विषय
जत : जत नगरपरिषद हद्दीतील चडचण- ईस्लामपूर या राष्ट्रीय महामार्गावरील प्रशासकिय इमारतीसमोरील वाहतूकीला अडथळा ठरणारी सर्व अनधिकृत अतिक्रमणे तात्काळ काढण्याचे तहसिलदार यांनी सबंधित विभागांना आदेश दिले आहेत.किमान या पत्रानंतर तरी तहसील कार्यालया समोरील रस्ता मोकळा श्वास घेणार का ? हे औत्सुक्याचे ठरणार आहे.जत येथील नविन प्रशासकिय इमारतीसमोरील चडचण-इस्लामपूर या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खोकी धारकांनी अतिक्रमणे करून रहदारीस व वाहतूकीस अडथळा निर्माण केला आहे.या अतिक्रमण धारकांत तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी,पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी जवळीक असणाऱ्या व्यक्ती तसेच राजकिय पक्षाशी सबंधित असलेल्या व्यक्ती यांचा सबंध असल्याने ही अतिक्रमणे कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत.
या अतिक्रमण धारकांनी जत तहसिलदार यांचे निवासासमोरील गेटमधून वाहने आत बाहेर ये जा करतात ते ठिकाणही सोडले नव्हते.त्यामुळे तहसिलदार यांनी या जागेला तार कंपाऊंड घालून घेतले आहे.
इतकेच नाही जत पंचायत समितीकडील अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासात येणा-या वाहनांना आत बाहेर ये जा करताना या अतिक्रमणांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्याचप्रमाणे या अतिक्रमित खोक्यांपैकी एका एका खोकी धारकांची दोन ते तीन खोकी असल्याचे व ही खोकी भाड्याने देऊन त्याचा व्यापार सुरू असल्याचेही उजेडात आले आहे.तर काहीनी या खोक्यांची विक्री ही केली आहे.या अतिक्रमणांमुळे खोकिधारकांत रोज संघर्ष उफाळून येत असून यामध्ये एखाद्याचा जिव ही जाण्याची शक्यता आहे.या राष्ट्रीय महामार्गावरच विविध शाळा,हायस्कूल,महाविद्यालय, न्यायालय,पंचायत समिती,प्रांत कार्यालय अशी सर्व शासकिय कार्यलये व शैक्षणिक संस्था असल्याने या मार्गावर नेहमी वाहतूकीची वर्दळ दिसून येत आहे.या अतिक्रमणांमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका असल्याने सर्व सामान्यांना या वाहतूकीचा अडथळा निर्माण होत असल्याने या बाबत सोशल मिडीया,विविध वृत्तपत्रे व पालक वर्गातून अतिक्रमणे दूर करण्यासंदर्भात मागणी होऊ लागल्याने जतचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारीसाहेब प्रविण धाणोरकर यांनी गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यांनी महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग तहसिल कार्यालय जत जि.सांगली.क्र.एम.ए.जी/ वशी/११८/ २०२५. दिनांक- २७/०१/ २०२५.ने उपअभियंता,राष्ट्रीय महामार्ग, उपविभाग कोल्हापूर, ताराबाई पार्क जवळ ,कोल्हापूर, मुख्याधिकारी नगरपरिषद जत,पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे जत व उपअभियंता विज वितरण कंपनी जत.यांना दिलेल्या लेखी आदेशात म्हंटले आहे की,तहसील कार्यालय जत समोर व तहसिलदार निवासस्थाना समोर रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्टाॅलधारकांनी अतिक्रमण केले आहे.एस.आर.व्ही.एम.हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना जाणे- येणेस व वाहन वाहतूकीला अडथळा निर्माण होत असलेने व रस्ता ओलांडतांना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमणांमुळे जागेअभावी तहसिल कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात कामासाठी येणा-या नागरिकांची गर्दी होत असून अनुचित प्रकार नाकारता येत नाही.त्या अनुषंगाने आपले स्तरावर संयुक्तरित्या कारवाई करून सदर अतिक्रमणे योग्य त्या पोलीस बंदोबस्तात काढण्यात यावीत तसेच तहसिल कार्यालयासमोर असलेल्या अतिक्रमित खोकी धारकांना दिलेले विज कनेक्शन तात्काळ बंद करण्यात यावे व केले कार्यवाहीचा अहवाल तहसिलदार कार्यालयाकडे सादर करण्यात यावा असे म्हंटले आहे.