मी सिनिअर मंत्री, ‘गृहमंत्री’पद फक्त राहिलंय

0
214

पालकमंत्री चंद्रकांत पाटील : तासगावातील दुर्गामाता मंदिर शक्तीस्थळ ठरेल


तासगाव : मी राज्यातील सिनिअर मंत्री आहे. जवळपास सर्व मंत्रीपदे मी भूषवली आहेत. 'गृहमंत्री'पद फक्त राहिले आहे, असे विधान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. शिवाय तासगाव येथे शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने उभारलेले दुर्गामाता मंदिर सर्वांसाठी शक्तीस्थळ ठरेल, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.

   

येथील शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने सुमारे 4 कोटी 65 लाख रुपये खर्चून भव्य असे दुर्गामाता मंदिर उभारले आहे. या मंदिरात दुर्गामातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहन कार्यक्रम सुरू आहे. त्यानिमित्ताने आज महाआरतीचे आयोजन पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. महाआरतीनंतर मंत्री पाटील बोलत होते.

  


ते म्हणाले, शिवनेरी मंडळाचे काम स्फूर्तीदायी आहे. सध्या तरुण मंडळे अनेक जयंती उत्सव साजरी करतात. वर्गणी गोळा करतात. मात्र जमा झालेल्या पैशांचा विनियोग डॉल्बी किंवा अन्य अनावश्यक गोष्टींवर होतो. मात्र शिवनेरी मंडळाने समाजापुढे आदर्श घालून दिला आहे. या मंडळाचे दहीहंडीमधील सातत्य व त्यातून उभारलेल्या निधीतून दुर्गामातेचे मंदिर उभारणे, हा खरोखर स्फूर्तीदायी उपक्रम आहे.



मंत्री पाटील म्हणाले, शिवनेरी मंडळाचे अध्यक्ष अनिल जाधव यांचा आकस्मित मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर मंडळाने आजतागायत अध्यक्ष बदलला नाही. आजही स्व. अनिल जाधव हेच या मंडळाचे अध्यक्ष आहेत. ही कौतुकाची बाब आहे. या मंडळाने दहीहंडीमध्ये मिळवलेला नावलौकिक अभिमानास्पद आहे.

   

भाजप किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री संदीप गिड्डे - पाटील म्हणाले, अनिल जाधव यांनी हजारो युवकांना एकत्रित करून शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली आहे. आज या मंडळात सुमारे 1200 गोविंदा कार्यरत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे मंडळ म्हणून आमचा नावलौकिक आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वात अगोदर आठ थर लावण्याचा इतिहास या मंडळाने रचला आहे. आजपर्यंत शेकडो दहीहंड्या आम्ही फोडल्या आहेत.

   

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संदीप सावंत, शीतल पाटील, राहुल बाबर, आशिष जाधव, आदित्य जाधव, आकाश माने, विशाल भोसले, अभय माने, आदित्य येसुगडे, यश लुगडे, स्वप्नील पाटील, स्वाती सूर्यवंशी, उदय भोसले यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य, महिला उपस्थित होत्या.

प्रत्येक नेत्यांची हंडी आम्ही कधी ना कधी फोडतोच : गिड्डे – पाटील

    
तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात भाजप किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री संदीप गिड्डे - पाटील हे गेल्या काही महिन्यांनापासून सक्रिय झाले आहेत. भाजपला गतवैभव मिळवून देण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. रविवारी त्यांच्या नेतृत्वाखाली तासगाव आणि कवठेमहांकाळ येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या. गिड्डे - पाटील यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे पाठबळ मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज बोलताना गिड्डे - पाटील म्हणाले, जिल्ह्यात व राज्यात अनेक नेत्यांच्या दहीहंड्या आम्ही फोडल्या आहेत. प्रत्येक नेत्यांची हंडी आम्ही कधी ना कधी फोडली आहे. त्यांचे हे वक्तव्य एका दगडात अनेक पक्षी मारणारे होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here