जत : जत तालुक्यातील एका गावात तरुणीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. ८ मे रोजी सायंकाळच्या सुमारास गावातील एका पडक्या इमारतीत दोन बिहारी तरुणांनी तरुणीवर अत्याचार केला. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात बहादुर कुमार मंडल, रोहित कुमार मंडल (मूळ रा. बिहार) या दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीने तरुणीला मोबाईलवर चित्रपट दाखवतो असे सांगून त्या इमारतीकडे घेऊन गेला. तिथे तिचा विरोध असतानाही तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या आरोपीनेही तिच्याशी जोरजबरदस्ती केली. या घटनेत पीडितेला शारीरिक जखमाही झाल्या आहेत.
या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. संशयित दोघेही बिहार राज्यातील असून सध्या जत तालुक्यात वास्तव्यास होते.
अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही घटना समाजमनाला हादरवणारी असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.