सोन्याळ फाट्यावर १५ रोजी रास्ता रोकोचा इशारा
माडग्याळ : जत तालुक्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ योजनेतून दोड्डुनाला तलावाकडे जाणाऱ्या माडग्याळ ओढापात्रात तत्काळ पाणी सोडण्याची जोरदार मागणी माडग्याळ, सोन्याळ, कुलाळवाडी, उटगी, उमदी, निगडी बुद्रुक आदी गावांतील ग्रामस्थांनी केली आहे. पाणी न सोडल्यास सोन्याळ फाट्यावर १५ मे रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
तापमानाने ४० अंशावर मजल मारलेली असताना संपूर्ण भागात उन्हाळ्याचा कहर जाणवत आहे. गावा-गावांत टंचाईची झळ अधिक तीव्र झाली आहे. अद्याप म्हैसाळ योजनेचे पाणी काही भागात न सोडल्याने पिण्याच्या पाण्यासह शेती व जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दोन महिन्यापूर्वीच माडग्याळ ओढापात्रात पाणी सोडण्याचे प्रशासनाने आश्वासन दिले आहे. मात्र, ते आश्वासनच ठरले आणि संयमाचा बांध फुटला आहे. गेल्या वर्षी सायफन पद्धतीने काही प्रमाणात पाणी मिळाले होते, पण यंदा पाणी मिळालेले नाही. शेतकरी पीक वाचवू शकले नाहीत आणि जनावरांनाही पाण्याविना हाल सहन करावे लागत आहेत.जतपूर्व भागातील सोन्याळ माडग्याळ, कुलाळवाडी, उटगीच्या बहुतांश भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
परिणामी, शेतकरी, बागायतदार आणि सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि असंतोषाचे वातावरण आहे. यंदा स्थिती बिकट असून,पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांसाठी देखील पाण्याची टंचाई तीव्र बनली आहे.काही गावांत बागायती फळपिके वाळत असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
सोन्याळकरांचा रास्ता रोकोचा इशारा
म्हैसाळ योजनेचे पाणी अजूनही सोन्याळ परिसरातील बगलीवस्ती, परीटवस्ती, नदाफवस्ती, जमाखडीवस्ती, निवर्गीवस्ती मुचंडीवस्ती, उमराणीवस्ती, सनोळेवस्ती आदी ठिकाणी पोहोचलेले नाही. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी १५ मे रोजी सोन्याळ फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
आमदार पडळकरांनी लक्ष द्यावे…
शेतकऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे, याबाबत लक्ष घालून म्हैसाळ योजनेतून माडग्याळ ओढापात्रात तत्काळ पाणी सोडण्यासाठी दबाव टाकण्याची मागणी केली आहे.
फोटो वापरा