शासनाचा हिरवा कंदील : नंदादीप तालुका म्हणून घोषणा
जत : राज्यातील दुष्काळी तालुका असलेल्या जत तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना बंद पडली होती. ही योजना सुरू व्हावी यासाठी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहयो मंत्री भरत गोगावले यांचा जत दौरा आयोजित केला. मेळावा घेत जतला मनरेगा योजना सुरू करावी, रोजगार हमी योजनेचा पायलट प्रोजेक्ट जतमध्ये राबवावा, अशी मागणी केली होती.
आ.पडळकर यांनी यासाठी शासन व प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा केला. रोहयो नियोजन विभागाचे कक्ष अधिकारी भरतसिंग निकुंभ यांनी जिल्हाधिकारी यांना पथदर्शी योजनांची अंमलबजावणीबाबत निर्देश नुकतेच देत राज्यातील रोजगार हमी योजनेचा पायलट प्रोजेक्टसाठी तालुक्याची निवड केली असून राज्यातील पहिलाच नंदादीप तालुका म्हणून जत तालुक्याची घोषणा केली आहे.
अवर्षणग्रस्त जत तालुका सुविधा संपन्न कुटुंब मिशनच्या माध्यमातून नंदादीप तालुका म्हणून विकसित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. याच अनुषंगाने आ. गोपीचंद पडळकर यांनी रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत १३ फेब्रुवारी रोजी जत येथे शेतकरी मेळावा घेतला होता. नुकतेच याबाबतचे निर्देश शासनाचे कक्ष अधिकारी भरतसिंग निकुंभ यांनी जिल्हाधिकारी जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांना रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.शासनाच्या निर्णयामुळे विविध योजनेतून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार आहे. या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. शासनाच्या वतीने शुक्रवारी नियोजन विभाग रोजगार हमीच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रकामध्ये रोजगार हमी योजनेचा नंदादीप तालुका म्हणून पहिला प्रोजेक्ट जत तालुक्यात राबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
शासनाच्या विविध योजनेच्या अभिसरणातून सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबवणे व सर्वांगीण ग्रामसमृद्धी साध्य करण्याबाबत धोरण निश्चित केलेले आहे. या धोरणाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक व शाश्वत विकास साध्य करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत येथे मेळावा घेतला होता. या मेळाव्यात शासन निर्णयानुसार रोजगार हमी योजनेचा पहिला प्रोजेक्ट राबवण्यात येणार अशी घोषणा मंत्री भरत गोगवले यांनी केली होती. याच संदर्भाला अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून निवड केल्याचे स्पष्ट केले आहेत. याकरीता रोहयोचे नियोजन विभागाच्या वतीने ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
पहिला प्रोजेक्ट : आ. पडळकरांचे मोठे यश
मनरेगा योजना ही जतसाठी वरदान ठरलेली योजना पण काही मोजक्या मंडळींनी त्यावर ताव मारत कोट्यवधींचा घोटाळा केला. दोन गटविकास अधिकाऱ्यांना मनरेगा घोटाळामुळे जेलची हवाही खावी लागली. जतचा मनरेगा घोटाळा राज्यभर गाजला. शासनाने तालुक्यातील मनरेगा योजना गुंडाळली. अखेर आ. पडळकर यांनी शासन, प्रशासन यांच्याकडे बंद पडलेली मनरेगा योजना सुरू करण्याचा प्रयत्न केला व त्याला यश आले. इतकेच नव्हे तर राज्यातील रोजगार हमी योजनेचा पायलट प्रोजेक्टसाठी एकमेव तालुक्याची निवड शासनाने केली आहे. आरटीओ कार्यालयापाठोपाठ मनरेगा योजनेचा पायलट प्रोजेक्ट जतमध्ये सुरू झाला आहे. आ. पडळकर यांचे हे मोठे यश मानले जात आहे.
पाच वर्षात टप्याटप्याने घेणार गावे
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सद्यस्थितीत असणाऱ्या योजना व नाविन्यपूर्ण योजना तालुक्यात पाच वर्षात राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. याकरीता तालुक्यातील प्राधान्याने टप्याटप्याने गावाची निवड करण्यात येणार आहे. विहीर, शेत तलाव, वृक्ष लागवड, बांबू लागवड, जनावराचा गोठा, ओढापात्रातील गाळ काढणे, समतल चर, यासारख्या अनेक विविध योजनेवर भर दिला जाणार आहे.