कवठेमहांकाळ : तालुक्यातील कुकटोळी येथे उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांच्यासह पोलिस पथकाने उसाच्या शेतात छापा टाकून 3 लाख 36 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. पोलिसांनी सुदाम गुंडा निकम (रा. कुकटोळी) याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
कुकटोळी गावापासून दोन कि.मी. अंतरावर सुदाम याच्या शेतात वस्ती आहे. वस्तीलगत घराच्या बाजूला उसाची शेती आहे. उसाच्या शेतीच्या मध्यभागात गांजाची लागवड केली होती. शेतात गांजाची झाडे असल्याची बातमी पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तत्काळ घटनास्थळी छापा टाकला असता, शेतात 4 फुटाइतक्या उंचीची गांजाची 8 झाडे पोलिस पथकास निदर्शनास आली. पोलिसांनी ही गांजाची झाडे जप्त केली असून त्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत सुमारे 3 लाख 63 हजार रुपये आहे. निकम याच्यावर गुंगीकारक औषधे द्रव्य अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, अमोल शिवशरण, पोलिस उपनिरीक्षक विनायक मसाळे, वैभव पाटील, रवींद्र भापकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुभाष पडळकर यांनी केली.