‘
जत : तालुक्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजने अंतर्गत लकडेवाडी परिसरात सिक्स केजी स्क्वेअर सेंटीमीटर ऐवजी फोर केजी स्क्वेअर सेंटीमीटरची पाईप वापरल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. ठेकेदार मोहन जंगम यांनी शासनाची १० लाख ५९ हजार २४० रुपयाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ठेकेदाराने शासनाची फसवणूक केल्याची फिर्याद कार्यकारी अभियंता अजिंक्य भारत जाधव यांनी उमदी पोलिस ठाण्यात दिली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी याप्रकरणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे तक्रार के ली होती.
फसवणूकप्रकरणी ठेकेदार मोहन कलय्या जंगम (शिवशक्ती कंट्रक्शन), शांतीवन कॉम्प्लेक्स, नेमिनाथनगरजवळ विश्रामबाग, सांगली, यांच्याविरोधात उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जत तालुक्यात गेली तीन वर्ष म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून वंचित शिवारांना पाणी देण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरू आहे. लकडेवाडी येथे निकृष्ट पाईप व खुदाई कमी झाल्याच्या तक्रारी होत्या. आमदार गोपीचंद पडळकर यांनी २६ मार्च २०२५ रोजी मंत्रालयात झालेल्या जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे निकृष्ट पाईप टाकल्याबाबत लक्ष वेधले. निकृष्ट पाईपचे तुकडे त्यांच्याकडे दिले होते. त्यावर विखे-पाटील यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार, मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांनी कार्यालयीन चौकशीचे आदेश दिले होते. लकडेवाडी येथील बंदिस्त पाईपलाईनमध्ये शासनाच्या निविदाप्रमाणे १८० एमएम व्यासाच्या सिक्स केजी स्क्वेअर सेंटीमीटरच्या पाईपचा पुरवठा करणे, वापरणे, अंथरणे, असे नमूद असताना ठेकेदार यांनी १८० एमएम व्यासाच्या फोर केजी स्क्वेअर सेंटीमीटरची पाईप वापरल्याचे निदर्शनास आले. निविदांमधील दोन्ही पाईपच्या दरांच्या तफावतीप्रमाणे १० लाख ५९ हजार २४० रुपये रकमेची शासनाची फसवणूक केली आहे. यानुसार जंगम यांच्याविरोधात उमदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.