सांगली : वट पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने तिच्या नवऱ्याचे प्राण यमाकडून परत आणले होते, अशी आख्यायिका आहे. म्हणून सुवासिनी महिला पतीच्या प्राणांचं रक्षण व्हावं आणि आपल्या पतीला सत्यवानाप्रमाणे दीर्घायुष्य लाभावं यासाठी व्रत करतात. परंतु, सांगलीच्या कुपवाडमध्ये वटपौर्णिमेच्या रात्री एका महिलेने आपल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कुपवाडमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने आपल्या पतीचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अनिल तानाजी लोखंडे, (वय 50) असं मृत पतीचं नाव आहे. कुपवाड शहरातल्या एकता नगर या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी पत्नी राधिका इंगळेला अटक केली आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीच राधिकाचं अनिल लोखंडे यांच्याशी लग्न झालं होतं.
पोलिसांच्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, कुपवाड शहरातल्या प्रकाश नगर येथील एकता कॉलनी या ठिकाणी राहणारे अनिल लोखंडे, यांचा 17 मे रोजी सातारा जिल्ह्यातल्या खटाव येथील राधिका इंगळे या तरुणीबरोबर विवाह झाला होता. दरम्यान लग्नाच्या अवघ्या 15 ते 16 दिवसातच अनिल लोखंडे आणि राधिका यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता. 10 जून रोजी त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर रात्रीच्या सुमारास झोपलेल्या अवस्थेतील अनिल लोखंडे यांच्या डोक्यात राधिकाने कुऱ्हाडीने घाव घालत अनिल लोखंडे यांना ठार मारलं आहे. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात अनिल लोखंडे पडलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनास्थळी पंचनामा केला असता आपणच खून केल्याची कबुली राधिका लोखंडे हिने दिली आहे. त्यानुसार राधिका लोखंडेला अटक करण्यात आली आहे.
ReplyForwardAdd reaction |