*वडगाव येथील एकाविरोधात गुन्हा दाखल : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक*
तासगाव – कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. याप्रकरणी विजय जालिंदर पाटील (रा.वडगाव, ता. तासगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला तासगाव पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, आमदारांबद्दल अतिशय घाणेरड्या भाषेत पोस्ट व्हायरल केल्याने राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
वडगाव येथील विजय जालिंदर पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त ठरले आहेत. त्यांनी गावात एका ठिकाणी मठ तयार केला आहे. त्याठिकाणी बसून तो चक्क दारू व अन्य नशेचे पदार्थ विकत असतो. वडगाव येथील महिलांनी काही महिन्यांपूर्वी या मठातील दारू अड्डा उध्वस्त केला होता. त्यावेळी त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता.
दरम्यान, विजय पाटील याने काल फेसबुकवर तासगाव – कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली. ही पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाली. पोस्ट पाहून राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) कार्यकर्ते आक्रमक झाले. 50 हुन अधिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठले. विजय पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ‘खाकी’चा हिसका दाखवावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली.
संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांची भेट घेतली. त्यानंतर पोलिसांनी विजय पाटील याला वडगाव येथून ताब्यात घेतले. त्याला तासगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान, रात्री उशिरा हातनूर येथील सचिन काशिनाथ पाटील यांनी विजय पाटील याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, आमदारांबद्दल अतिशय घाणेरड्या भाषेत पोस्ट व्हायरल केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी विजय पाटील याचा वडगाव येथील तथाकथित मठ उध्वस्त केला. त्याठिकाणी असलेल्या दारूच्या बाटल्या व अन्य साहित्य विस्कटून, फोडून टाकले. तर यापुढे आमदार रोहित पाटील यांच्याबद्दल कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी दिला आहे.




