पलूस, कडेगाव तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश | आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या पाठपुराव्याला यश

0
0

पलूस : खरीप हंगाम २०२६ मध्ये अपुऱ्या पावसामुळे आणि पिकांच्या नुकसानीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील ३०५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले असून, सांगली जिल्ह्यातील पलूस आणि कडेगाव तालुक्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीला स्थगिती, कृषी वीजबिलात सवलत आणि शालेय-महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी अशा विविध उपाययोजनांचा लाभ मिळणार आहे.

तसेच रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू करणे, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था, जनावरांसाठी चारा उपलब्ध करणे आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचे नियोजन आहे. शासनाच्या निर्णयामुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक व प्रशासकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पावसाअभावी पिकांचे उत्पादन घटले असून, बियाणे, खते, औषधे आणि मजुरीचा वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त यादीतील समावेशामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. संबंधित सवलतींचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here