ईश्वरपूर : जिल्हा परिषद शाळा शिवाजीनगर, बोरगाव येथे ‘लोककलावंत आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत बहुरूपी कलावंत तानाजी शेगर (जामखेड) यांनी बहुरूपी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. त्यांच्या शाब्दिक व कृतीप्रधान विनोदांनी विद्यार्थी अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
विद्यार्थ्यांना विविध सामाजिक घटकांची ओळख व्हावी, समाज आणि शाळेमध्ये सुसंवाद निर्माण व्हावा तसेच सर्वसमावेशक व सुजाण नागरिक घडावेत, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. कलाकार, शिक्षक, गायक, चित्रकार, मूर्तिकार यांसह विविध समाजघटकांच्या योगदानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.
बहुरूपी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत शेगर यांनी विनोदातून विद्यार्थ्यांना आनंद दिला. तसेच महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला जपण्याचे आवाहन त्यांनी केले. विदूषक, सोंगाड्या, वासुदेव आदी लोककलांचे महाराष्ट्र माहेरघर असून, या कला पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे मुख्याध्यापक डॉ. सी. बी. क्षीरसागर यांनी सांगितले.
यावेळी एसएससी अध्यक्षा शीतल कोळेकर, स्वाती गायकवाड, विजया वायदंडे, वंदना गावडे, संजय दंडवते, गणेश काटे, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. उपक्रमास सरपंच जितेंद्र पाटील, उपसरपंच अनिकेत वाटेगावकर, गटशिक्षणाधिकारी प्रदीप तुप्पट-पाटील व विस्तार अधिकारी छाया माळी यांचे सहकार्य लाभले.




