जतमध्ये बोगस व्यक्ती उभी करून ११.४३ हेक्टर जमीन हडपण्याचा आरोप

0
7

बनावट आधार-पॅनच्या आधारे खरेदीदस्त; नऊ जणांविरुद्ध गुन्हा

जत, प्रतिनिधी : गुळवंची (ता. जत) येथील ११.४३ हेक्टर म्हणजेच सुमारे २८.२४ एकर शेतजमीन जमीनमालकांच्या जागी बोगस व्यक्ती उभी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर नावावर केल्याप्रकरणी जत पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शेखर दिनकर पाठक (रा. चिंचवड, पुणे, मूळ जत) यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गुळवंची येथील गट क्रमांक १०३, खाते क्रमांक ३९९ मधील जमीन पाठक यांच्या मालकीची आहे.

फिर्यादीनुसार, २७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२.२८ वाजता जत येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात शेखर पाठक आणि विमल पाठक यांच्या नावाने दोन बोगस व्यक्तींना उभे करण्यात आले. त्यांच्या नावाने बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करून त्यांचा वापर करत जमिनीचा खरेदीदस्त करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर जमीन रविराज श्रीमंत खांडेकर यांच्या नावावर करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणात रविराज खांडेकर याच्यासह विठ्ठल रामु हेगडे, गोपाल धुळाप्पा शिवशरण, मुनीर रुबाबुद्दीन जमादार, विजय अण्णु गावडे, आनंदा शिवाप्पा तस्ती, अजिंक्य अनिल घटाके तसेच जमीनमालकांच्या जागी हजर राहिलेल्या अनोळखी पुरुष व महिलेचा आरोपींमध्ये समावेश आहे.

अजिंक्य घटाके याच्यावर दस्त तयार करण्यासह जमीनमालकाच्या जागी हजर राहून दस्त केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, जत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here