देहू : शिवकृपा सहकारी पतसंस्था लि., मुंबई पतसंस्थेचे २०२६-२७ या आर्थिक वर्षातील अर्धवार्षिक चिंतन व प्रशिक्षण शिबिर नुकतेच ४ व ५ ऑक्टोबर रोजी गाथा मंदिर, देहू येथे पार पडले. यावेळी प.पू. गुरुवर्य ह.भ.प. श्री. पांडुरंग महाराज घुले यांनी संस्थेच्या प्रगतिशील वाटचालीचे कौतुक करत सहकाराला अध्यात्माची जोड देण्याचे आवाहन केले.
संस्थेच्या १२२ शाखांच्या पहिल्या सहामाहीतील कामकाजाचा आढावा शिबिरात घेण्यात आला. संस्थेच्या संमिश्र व्यवसायात ४६५ कोटी रुपयांची वाढ तसेच कर्जवसुलीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाखांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी पांडुरंग महाराज घुले यांनी संस्थेने ग्राहकहिताला प्राधान्य देत ठेवींमध्ये वाढ करावी आणि कर्जवितरण करताना योग्य ग्राहकांची काळजीपूर्वक निवड करावी, असा सल्ला दिला. संस्थेची प्रगती ही कर्तव्यनिष्ठ कामातूनच साध्य होते, असे त्यांनी नमूद केले.
संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष गोरख चव्हाण यांनी शिवकृपाचे सभासद, खातेदार व हितचिंतक यांच्या विश्वासाला साजेसे काम सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. लवकरच संस्थेचा संमिश्र व्यवसाय ७ हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कर्मचाऱ्यांनी ज्ञानाने परिपूर्ण राहून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, अद्ययावत पद्धतीने गतिमान कामकाज करावे, असे मार्गदर्शन करण्यात आले. संस्थापक व उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी संचालक, प्रशासकीय व विभागीय व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक तसेच कर्मचारी उपस्थित होते. प्रार्थना व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.



