राजस्थान : राजस्थानमधील खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात घरी परतणाऱ्या भाविकांच्या प्रवासाचा भीषण अपघातात अंत झाला. कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर शंभूपुरा गावाजवळ भाविकांच्या क्रूझर वाहनाने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रासह राजस्थानमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक असे एकूण १६ जण क्रूझर वाहनातून राजस्थानमधील खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपल्यानंतर सर्वजण महाराष्ट्राकडे परतीच्या प्रवासाला निघाले होते. दरम्यान, कोटा जिल्ह्यातील नांता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभूपुरा गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला.
महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने भाविकांचे वाहन थेट ट्रकवर जाऊन आदळले. धडक इतकी भीषण होती की क्रूझर वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. वाहनातील प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले.
नऊ जणांचा जागीच मृत्यू
या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कोटा प्रशासनाने दिली आहे. सहा जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
कोटाचे अपर जिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी या घटनेला दुजोरा दिला. मध्यरात्री १६ जणांना घेऊन जाणारे वाहन शंभूपुराजवळ ट्रकला धडकले. हा अत्यंत भीषण अपघात होता. नऊ जणांना जीव गमवावा लागला. हे सर्वजण खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात परतत होते, अशी माहिती त्यांनी दिली.
परतीचा प्रवास ठरला अखेरचा
देवदर्शनासाठी आनंदाने घराबाहेर पडलेल्या कुटुंबावर काळाने अचानक घाला घातला. दर्शन घेऊन सुखरूप घरी परतण्याची प्रतीक्षा करणाऱ्या नातेवाईकांवर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, मृतदेहांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू असून मृतांची ओळख आणि अपघाताची नेमकी कारणे याबाबत पोलीस तपास करीत आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.




