रेमडेसिवीअर, ऑक्सिजन, एचआरसीटी टेस्ट आदिंबाबत संभ्रम दूर होणे आवश्यक ; जिल्हाधिकारी

0सांगली : कोविडची महामारी दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. या काळात रेमडेसिवीअर, ऑक्सिजन, एचआरसीटी टेस्ट आदिंबाबत लोकांच्या मनातील संभ्रम दूर होणे आवश्यक असून महामारीच्या या काळात उपलब्ध साधनसामग्रीचा जबाबदारीने व जपून, आवश्यकतेनुसार वापर होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

 कोविड-19 विकार, उपचार याबद्दल लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम आहेत. बरेचदा काही चुकीच्या माहितीमुळे रूग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची धावपळ होते. ऑक्सिजन, रेमडेसिवीअर, होम आयसोलेशन, एचआरसीटी, लसीकरण, समुपदेशन, पोस्ट कोविड त्रास आदि विषयांबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व जिल्हा टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, डॉ. नाथानियल ससे, डॉ. आनंद मालाणी, डॉ. सोमनाथ मगदूम, डॉ. अविनाश झळके, डॉ. अमृता दाते, डॉ. परमशेट्टी, डॉ. प्रिया प्रभू आदि उपस्थित होते.

 रेमडेसिवीअर देण्याबाबतचा निर्णय उपचार करणाऱ्या डॉक्टरांना घेवू द्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील असिस्टंट प्रोफेसर डॉ. सोमनाथ मगदुम आणि क्रांती कार्डिॲक सेंटर येथील डॉ. अविनाश झळके यांनी रेमडेसिवीरच्या वापराबाबत माहिती देताना सांगितले की, कोविड-19 नवीन आजार आहे. यावरील उपचार पध्दतीबाबत संशोधन सुरू आहे. प्राथमिक संशोधनाअंती काही औषधे थोड्याफार प्रमाणात लागू झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सामान्य व्यक्तीला माहिती असणारे रेमडेसिवीअर हे औषध आहे. हे औषध दिले म्हणजे रूग्णाचा निश्चितपणे प्राण वाचेल असा गैरसमज पसरल्याने प्रत्येक कोविड रूग्णाला हे औषध दिले जावे असा त्यांच्या नातेवाईकांचा आग्रह असतो.  तथापी, हे औषध लाईफ सेव्हींग ड्रग नाही. या औषधाची रूग्णाला गरज आहे किंवा नाही हे रूग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना ठरवू द्यावे. प्रत्येक औषधाचे साईड इफेक्ट असतात त्याप्रमाणे रेमडेसिवीअरचेही साईड इफेक्ट आहेत. गरज नसताना औषध दिल्यास त्याचा साईड इफेक्टच होतो. त्यामुळे रूग्णाला रेमडेसिवीअर द्यावे किंवा नाही हे रूग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना ठरवू द्यावे. नातेवाईकांनी स्वत:हून हे औषध रूग्णाला द्यावे याबाबत डॉक्टरांवर दबाव टाकू नये. रेमडेसिवीअर हे औषध विषाणू मारत नसून विषाणूंचे रिप्लीकेशन थांबवण्यामध्ये याचा काही प्रमाणात फायदा आहे. त्यामुळे हॉस्पीटलमध्ये ॲडमीट होण्याचा कालावधी काहीसा कमी होतो. त्यामुळे रेमडेसिवीअर म्हणजे कोविडची ट्रीटमेंट हा गैरसमज दूर व्हावा. रेमडेसिवीअर शिवाय ही कोविडची ट्रीटमेंट आहे. रेमडेसिवीअर प्रामुख्याने ज्या रूग्णाला ऑक्सिजनची गरज लागते त्याला दिल्यास फायदा होतो. आजाराच्या पहिल्या 9 दिवसात या औषधाचा वापर झाल्यास त्याचा फायदा होतो. आजाराच्या 10 व्या दिवसानंतर या औषधाचा वापर झाल्यास त्याची उपयुक्तता अत्यंत कमी आहे. ज्यांची ऑक्सिजन पातळी कमी होत नाही अशा रूग्णांना शक्यतो हे औषध वापरले जात नाही. अत्यावस्थ रूग्णाला रेमडेसिवीअर दिले की त्याचा जीव वाचेल हा गैरसमज कृपया करून घेवू नये.

 रेमडेसिवीअरचे दुष्परिणाम

रेमडेसिवीअरचे दुष्परिणामबाबत बोलताना डॉ. अविनाश झळके यांनी सांगितले की, रेमडेसिवीअर औषधाचा दुष्परिणाम हायपरसेंसेटीव्हीटी, किडनीवर ताण येणे, लिव्हरवर सूज येणे आदि 10 दिवसांमध्ये जाणवू शकतात असे सांगितले.

 गरज नसताना सरसकटपणे एचआरसीटी टेस्ट करू नका

डॉ. आनंद मालाणी यांनी एचआरसीटी टेस्टबाबत यावेळी माहिती दिली. यामध्ये त्यांनी एचआरसीटी हा शब्द प्रत्येक माणसाला माहित झाला आहे. कोरोना महामारीच्या काळात या टेस्टचा बेसुमारपणे वापर करण्यात येत आहे. प्रत्येक कोविड पेशंटला एचआरसीटी स्कॅनिंगची गरज नसते.  जे रूग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत, ज्यांचा ऑक्सिजन कमी होत नाही, ज्यांना अगदी सौम्य लक्षणे असून सौम्य औषधे सुरू आहेत अशा रूग्णांना एचआरसीटी स्कॅनिंगची गरज नाही. ज्या रूग्णांचे प्रामुख्याने ऑक्सिजन कमी होते अशा रूग्णांचे एचआरसीटी स्कॅनिंग केले जाते ते त्यांच्यामध्ये विषाणूंचा फैलाव किती आहे हे पाहण्यासाठी केले जाते. ज्या रूग्णांमध्ये कोविड चे निदान होत नाही, ज्यांची रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट, आरटीपीसीआर टेस्ट निगेटीव्ह येते पण लक्षणे कोविडची असतात अशावेळी अशा रूग्णांचे कोविडच्या आजाराबाबतचे निदान करण्यासाठी एचआरसीटी टेस्टचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे प्रत्येक रूग्णांचे सरसकट एचआरसीटी स्कॅनिंग करण्यात येवू नये. रूग्णांनी स्वत:हून जावून सीटीस्कॅन करून घेणे चुकीचे आहे. पहिल्या 7 दिवसांमध्ये स्कॅनिंग केल्यास त्याचा फारसा उपयोग होत नाही. एचआरसीटी स्कॅनिंगबाबतचा निर्णय हा रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना घेवू द्यावा.Rate Card

डॉ. परमशेट्टी यांनी एचआरसीटीबाबतची अधिकची माहिती देताना सांगितले की, काही रूग्ण पहिल्या, सातव्या, चौदाव्या दिवशी असे वारंवार एचआरसीटी स्कॅनिंग करत असतात. याची गरज नाही. कोरोनाची लागण झाल्यानंतर फुफुसांमध्ये फायब्रोसीस तयार व्हायला कमीत कमी दोन ते तीन आठवडे जातात. जे रूग्ण कोविड उपचारासाठी आयसीयुमध्ये होते, ज्यांना ऑक्सिजन दिला गेला, ज्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते, अशा रूग्णांनी  28 व्या दिवसानंतर सिटीस्कॅन करून घ्यावे.

या विषयावर बोलताना जिल्हाधिकारी डॉ. अ‍भिजीत चौधरी म्हणाले, आरटीपीसीआर व रॅपीड ॲन्टीजन टेस्ट प्राधान्याने करून घ्यावी. आपल्याकडे आरटीपीसीआरचा रिपोर्टही लवकरात लवकर मिळतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:हून एचआरसीटी करून घेवू नये.  याबाबतच्या सूचना रेडिओलॉजीस्टनाही देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

 आवश्यक काळजी घेतल्यास अनेक रूग्ण होम आयसोलेशनमध्येच बरे होतात

सेवासदनच्या डॉ. अमृता दाते यांनी होम आयसोलेशनबद्दल बोलताना सांगितले की, होम आयसोलेशनमध्ये बऱ्या होवू शकणाऱ्या रूग्णांनी हॉस्पीटलमधील बेड अडवू नये. महामारीच्या काळात रूग्णसंख्या आणि ऑक्सिजन बेड्ची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत निर्माण होते. कोविड-19 च्या आजारामध्ये 90 टक्के रूग्ण हे कोणत्याही कॉम्प्लीकेशनशिवाय या आजारातून बरे होवू शकतात. 10 टक्के रूग्णांना मात्र हॉस्पीटलायझेशनची गरज पडते. जे कोमॉर्बीड आहेत व गंभीर आहेत अशा रूग्णांना रूग्णालयात दाखल करून उपचार मिळाल्यास योग्य त्या रूग्णांना योग्य त्या वेळी योग्य ते उपचार मिळतील आणि असंख्य रूग्ण घरीच राहून होम आयसोलेशनमध्ये बरे होवू शकतील. पॅनीक कमी करणे ही या महामारीच्या काळात मोठी गरज निर्माण झाली आहे. व्यवस्थितरित्या स्वत:वर निर्बंध घालून घेतले, ताप, सर्दी, खोकला आदि संबंधित लक्षणे जाणवल्याबरोबर डॉक्टरांकडे जावून उपचार सुरू केले, त्यांच्या सल्ल्याने आवश्यकतेनुसार टेस्ट केली, टेस्ट रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आणि ताप, धाप जास्त प्रमाणात नसेल केवळ कणकण अथवा बारीकशी अंगदुखी असेल तर व्यवस्थितरित्या डॉक्टरांकडून औषधोपचार घेतल्यास आपण होम आयसोलेशनमध्ये बरे होवू शकता. पल्स ऑक्सिमीटर हे उपकरण सर्वांनी जवळ ठेवावे. प्रत्येकाने सहा मिनीटांची चालण्याची चाचणी करावी (6 मिनीट वॉक टेस्ट). तत्पूर्वी शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासावे. चालण्याच्या चाचणीनंतर पुन्हा एकदा ऑक्सिजन तपासावा. सुरूवातीची ऑक्सिजन पातळी 94 च्या पुढे असल्यास अत्यंत चांगली आहे. टेस्टनंतर ऑक्सिजन पातळी 3 ते 6 टक्यांपेक्षा कमी झाली तर तात्काळ जवळच्या रूग्णालयामध्ये डॉक्टरांना दाखवावे. ज्यांना हृदयविकार, आर्थायटीस, वय 60 पेक्षा जास्त असेल त्यांनी ही टेस्ट 3 मिनीटांची करावी.  होम आयसोलेशमधील रूग्णांनी आहार चांगला ठेवावा, सीबीसी टेस्ट करून घ्यावी, घरी असताना पालथे झोपावे, श्वसनाचे व्यायाम करावेत, असे केल्यानेही आजारातून आपण लवकर बरे होवू शकता. घरी असताना अचानकपणे त्रास होवू लागल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे. खूप ताप जास्त असेल व तो औषध घेवूनही बरा होत नसेल, ऑक्सिजनची पातळी 92 च्या खाली असेल, न चालताही धाप लागत असेल, व अन्य काही लक्षणे जाणवल्यास योग्य वेळीच रूग्णालयात जावून डॉक्टरांना दाखवावे. तसेच होम आयसोलेशन घरी शक्य नाही त्यांनी कोविड केअर सेंटरमध्ये स्वत:ला आयसोलेट करावे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज च्या सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रिया प्रभू यांनी सांगितले की,  कोरोना उपचारामध्ये सर्वात महत्वाची वेळ असून आपण रूग्ण सिरीयस होईपर्यंत वेळ घालवतो. ज्या क्षणी आपल्याला कोरोना सदृश्य लक्षणे दिसू लागतील त्यावेळेला आपल्याला आरटीपीसीआर करता येते. आरटीपीसीआरही चाचणी अत्यंत चांगली आहे. त्यामध्ये इन्फेक्शन अगदी कमी असले तरी सापडू शकते. आजाराच्या सुरूवातीला अगदी लक्षणे सुरू होतात त्यावेळेला शरीरातील व्हायरल लोड खूप जास्त असतो. त्यामुळे त्यावेळेला प्रसारही जास्त असतो. त्यामुळे ज्यावेळी लक्षणे सुरू होतात त्याचवेळी आरटीपीसीआर करा, घरामध्ये मास्क वापरायला सुरू करा. यामुळे आपण घरामध्ये होणार प्रसार थांबवू शकतो. रिपोर्ट येईपर्यंत घरामध्ये आयसोलेट व्हावे, थोडेसे वेगळे रहावे. रिपोर्ट पॉझिटीव्ह आला तरी कधीकधी कुठलेही लक्षणे नसतात, कधी लक्षणे अगदी सौम्य असतात, कुठलीही कोमॉर्बीडीटी नसते, अशावेळी धोके कमी असतात. त्यामुळे असे रूग्ण आपण घरामध्ये ठेवू शकतो. अशावेळी 10 दिवस स्वतंत्र खोलीमध्ये रहावे, असे शक्य नसेल तर त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवू शकतो. इतरांशी संपर्क होवू न देणे, मास्कचा वापर करणे, घरामधील हवा बदलण्यासाठी खिडक्या, दारे उघडी ठेवावीत, एवढी काळजी घेतली तर घरामधील प्रसार थांबवू शकतो. घरातील इतरांनाही काही लक्षणे दिसू लागल्यास त्यांचीही तात्काळ आरटीपीसीआर चाचणी करावी. 6 मिनीट वॉक टेस्ट दिवसातून दोन वेळ करावी.

या विषयावर बोलताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचे जवळपास 9  हजार  रूग्ण उपचाराखाली आहेत. यातील बरेचसे रूग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. या रूग्णांनी घराबाहेर पडू नये. आपण आपल्या कुटुंबाचे आणि आपल्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणू नये. स्‍वयंशिस्त सर्वांनी पाळणे आवश्यक आहे. गतवेळच्या विषाणूच्या तुलनेत यावेळचा विषाणू हा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव पसरविणारा आहे. त्यामुळे प्रत्येकाने आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

लसीकरणाबाबत सर्व संबंधित यंत्रणांना प्रशिक्षण देण्यात आले असून लस घेवून किरकोळ काही त्रास जाणवल्यास काय दक्षता घ्यावी याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात साडेचार लाखापेक्षा अधिक लसीकरण झाले असून आत्तापर्यंत यामध्ये कोणाताही गंभीर त्रास झाल्याचा दिसून आले नाही. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे व पहिला डोस ज्या लसीचा दिला आहे त्याच लसीचा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.

 कोरोना रूग्णाचे समुपदेशन महत्वाचे

डॉ. परमशेट्टी यांनी सांगितले की, कोरोनाचे आयसोलेशनमध्ये असणारे रूग्ण असोत किंवा रूग्णालयात दाखल झालेले रूग्ण असोत यांच्यात सुरूवातीच्या काळात एकाकीपणाची भावना मोठ्या प्रमाणात आढळून येते त्यामुळे कुटुंबातील अन्स सदस्य, उपचार करणारे डॉक्टर्स यांनी त्यांचे कौन्सलिंग करावे. आयसीयुमध्ये असणाऱ्या रूग्णांशी त्यांच्या नातेवाईकांना व्हीडीओ कॉलने संपर्क साधून दिला जातो. पोस्ट कोविडमध्ये नैराश्यग्रस्त असणाऱ्या रूग्णांना प्रशासनाव्दारे समुपदेशन करून त्यांना सकारात्मक बदल घडविण्यासाठी मदत केली जाते.

डॉ. नाथानियल ससे यांनी सांगितले की, पोस्ट कोविडमध्ये काही रूग्णांमध्ये मेंदूचे काही विकार, स्मरणशक्तीमध्ये अडथळा, एकाग्रततेमध्ये अडथळा असे विकार दिसून येत आहेत हे परिणाम थोड्या कालावधीसाठी रहात असून ते हळूहळू निघून जातात. अशा विकारांबद्दल फारशी काळजी करू नये असे त्यांनी सांगितले.

 सिव्हील हॉस्पीटल सांगली येथील ऑक्सिजन प्लँट हा ऑक्सिजन निर्मिती प्लँट नाही

सिव्हील हॉस्पीटलमधील ऑक्सिजन प्लँटबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सन 2019-20 मधील जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतील  निधीतून सांगली सिव्हील हॉस्पीटल येथे ऑक्सिजन टँक व बेड्स साठी ऑक्सिजन पाँईटचे काम करण्यात येत असून येत्या 10 दिवसात हा प्लँट सुरू होईल. हा प्लँट ऑक्सिजन जनरेशन प्लँट नसून ऑक्सिजन साठवण प्लँट आहे. तसेच हे रूग्णालय कोविड नसणाऱ्या रूग्णांच्या उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात सद्या 35 ते 40 मे. टन दैनंदिन ऑक्सिजनची गरज पडत असून त्यासाठी खूप प्रयत्न करून तो मिळवावा लागतो. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होवू नये यासाठी स्टेट टास्क फोर्स ने मार्गदर्शित केल्यानुसार ऑक्सिजनचा वापर कमी करून रूग्णांची ट्रीटमेंट करण्याबाबत कोरोनाचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सांगण्यात आले आहे. तसेच कोरोना बाधीत होणाऱ्या रूग्णांमध्ये 20 ते 25 टक्के रूग्ण हे मानसिकदृष्ट्या प्रभावीत होवून कोरोना झाला आहे म्हणजे ऑक्सिजनची गरज निर्माण झाली असून तो मिळालाच पाहिजे या भावनेतून रूग्णालयात दाखल होतात व गरज नसताना ऑक्सिजनचा वापर करतात. हा गैरसमज दूर करून जे रूग्ण घरी बरे होवू शकतात त्यांनी होम आयसोलेशमध्येच राहून उपचार घ्यावेत, असे आवाहन केले. त्यामुळे ऑक्सिजनचा अनावश्यक वापर टाळून गरजवंत रूग्णांना ऑक्सिजन उपलब्ध होईल. महामारीच्या काळात उपलब्ध साधनसामग्रीचा आवश्यक जबाबदारीने व जपून वापर होणे आवश्यक आहे. तसेच ऑक्सिजन ऑडीट करून घेण्याबाबतही रूग्णालयांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.