नवीन रुग्णसंख्या वाढू न देणे हाच सर्वोत्तम पर्याय

0
1



जत,संकेत टाइम्स : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. मात्र यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी घेत वेळीच तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे, असा सल्ला 

तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांनी दिला आहे. नवीन रुग्णसंख्या वाढू न देणे यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहन देखील त्यांनी केले.





जत‌‌ तालुक्यात वाढती कोरोना रुग्णसंख्या व त्यासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन व इतर औषधी यांची उपलब्धता यासंदर्भात म्हेत्रे यांनी माहिती देत कोरोना नियंत्रणासाठी रविवारी संध्याकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला आवाहन केले.
कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. 

तालुक्यात 400 सक्रिय रुग्ण असून त्यादृष्टीने बेड, ऑक्सिजन व औषधी याविषयी नियोजन केले जात आहे. 






बेड उपलब्ध झाले असले तरी ऑक्सिजनचा पुरवठा होणे आवश्यक असल्याने त्याची बचत करणे महत्वाचे असल्याचे म्हेत्रे म्हणाले. याशिवाय रेमडेसिविर इंजेक्शनचे उत्पादनच कमी झाल्याने त्याचा पुरवठा कमी असल्याने त्याविषयीदेखील रुग्णालयांना सूचना दिल्या असल्याचे सांगितले.
कोरोनाचे रुग्ण संख्या नियंत्रणात आणणे आवश्यक असून त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. रुग्णसंख्या वाढत राहिल्यास ऑक्सिजन, रेमडेसिविरसह मनुष्यबळाचीही कमतरता भासू शकते, अशी शक्यता वर्तवित पुढील धोके टाळण्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.





गेल्या वर्षापेक्षा आता कोरोनाचा संसर्ग गंभीर असून यामध्ये तरुणांनाही त्याची लागण होत आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणे टाळले पाहिजे तसेच थोडेही लक्षणे जाणवताच तात्काळ तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. अनेक ठिकाणी टायफाईडचा आजार म्हणून उपचार करून घेतले जात आहे. 







मात्र तसे न करता वेळीच तपासणी करावी आणि पुढील ऑक्सिजन व इतर औषधोप चारासाठी होणारी धावपळ तसेच गंभीर होण्याची स्थिती टाळता येऊ शकते, असे नमूद‌ केले.यावेळी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाविषयी देखील माहिती देत 45 वर्षाच्या पुढील सर्वांनी लसीकरण करून घेत धोका टाळावा असे आवाहन केले. लसींच्या उपलब्धतेनुसार सर्वांना लसीकरण केले जाणार असून असल्याचे त्यांनी सांगितले.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here