जतेत संचारबंदीही अवैध धंद्याना ऊत | वसूली कलेक्टरांकडून मिळकतीचा आकडा वाढविला ?
जत,संकेत टाइम्स : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत शहरात संचारबंदी,कडकडीत बंद पाळण्यात येत असूनही हप्तेबाज पोलीसामुळे मटका, जुगार, गांजा विक्री, खासगी सावकारी अशा अवैध धंद्याना ऊत आला आहे. शहरासह तालुक्यात बोकाळलेल्या अवैध धंद्यांना अटकाव करण्यात जत पोलिसांना गरज वाटत नसल्याचे चित्र आहे.
ठाण्यात ठिय्या मारलेल्या एका वसूली कलेक्टरच्या मध्यस्थीने महिन्याची वसूली बंद होऊ नये यांची खबरदारी अधिकाऱ्यांकडून घेतली जात असल्याने अवैध धंद्यांना बंळ देण्याचे काम सुरू आहे.शहरात अवैध धंदे सुरू असताना पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे.

कोरोनाचा विस्फोट झाला असतानाही शहरासह तालुक्यातील गावागावात अवैध धंदे बोकाळले आहेत. शहरात खुलेआम मटका घेतला जात असताना पोलिस प्रशासन मात्र मटका बंद असल्याची वल्गना करत आहे.
मटक्याप्रमाणे जुगार,चंदन, गांजा,गुटखा विक्री असे सर्रास काळे धंदे जोमात सुरू आहेत. अशा धंद्यांना पोलीसाचेच पाठबळ मिळत असल्याने शहराच्या गल्लीबोळात खुलेआम हे व्यवसाय सुरू आहेत.मटक्यासारख्या व्यवसायात असणाऱ्या आणि उजळ माथ्याने फिरणाऱ्या व्हाइट कॉलरमधील काळ्या धंदेवाल्यांना राजकीय वरदहस्तही मिळत आहे. त्यामुळे शहरात दिवसेंदिवस अवैध व्यवसायांना बळकटी मिळत असून अनेकांनी आपले साम्राज्य उभा केले आहे.