जतेत जनतेचा स्वयंस्फूर्तीने लाॅकडाऊनला प्रतिसाद ; तालुका थांबला
जत,संकेत टाइम्स : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात कठोर निर्बंध लावले गेले असून त्या अंतर्गत जत तालुक्यात गुरूवारपासू कडकडीत बंद पाळण्यात आला. याकरिता जनतेने स्वयंस्फूर्तीने सहकार्य केले हे विशेष! कोरोनाचे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.
सर्वसामान्य माणसांना घरीच राहून कोरोना संसर्ग टाळण्याकरिता प्रशासनाच्या वतीने आवाहन केले जात आहे. कोरोनाची वाढती संख्या सगळ्यांना चिंतेत टाकणारी आहे. रुग्णालयात रुग्णांना भरती करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रुग्ण भरती झाल्यावर औषधांचा तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा भयानक तुटवडा जिल्ह्यात आहे.
केमिस्टकडून विक्री बंद आहे. उपचाराकरिता डॉक्टरकडून रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी होत आहे. इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांची केविलवाणी धडपड नजरेत भरणारी आहे. अख्खे प्रशासन औषधाचा तुटवडा अनुभवत आहे. परंतु अपेक्षित सेवा अजून तरी सुरळीत झालेली नाही. अशा कठीणप्रसंगी प्रत्येकाने स्वतःला सावरत शासनाने पुरविलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने नियमितपणे सुरू आहे.

जत पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सर्व बीट अंतर्गत नाकाबंदी करण्यात आलेली आहे.चौका-चौकात पोलिसांची देखरेख असून नाहक फिरणाऱ्याला तंबी देण्यात येत आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने तेवढी सुरू असून बाकी सर्व बाजारपेठही बंद ठेवण्यात आलेली आहे.
तरुणाई मात्र रस्त्यावर फिरताना दिसते. नाहक कोणतेही काम नसताना चौकात किंवा आडोशाला उभी राहून गर्दी वाढवण्याचा प्रयत्न तरुणाई करीत आहे.
गत हप्तभरापासून ताप, सर्दी, खोकला यांचे रुग्ण वाढत आहेत. हेच रुग्ण कोरोनाचे संख्याबळ वाढवीत आहेत. साधा ताप जरी कुटुंबात आला तरी संपूर्ण परिवारात दहशत निर्माण होते.
जत बसस्थानकात बसेस अशा उभ्या होत्या,बाजार पेठेतही सुनसान होती.