येळवीत वाळू तस्कारांकडून कोतवालावर डंपर घालण्याचा प्रयत्न
जत,संकेत टाइम्स : येळवी (ता.जत) येथून बेकायदेशीर वाळू उत्खनन करून जाणाऱ्या वाळूच्या डंपरला रोखण्याचा प्रयत्न कोतवाल यांनी केला.डंपर चालकांनी कोतवाल बाळू चव्हाण यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसपाटील यांचे पती
सचिन माने – पाटील यांना धक्काबुक्की
करण्यात आली. वाळूतस्करांनी एका तासहून अधिकवेळ धिंगाणा घालून डंपर पळवण्याचा प्रयत्न केला. एक डंपर पकडून पोलिस व महसूल खात्याच्या ताब्यात डंपर दिला. सदरची घटना रविवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.ही घटना समजताच घटनास्थळी तहसीलदार सचिन पाटील तात्काळ दाखल झाले.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : रविवारी रात्री येळवीतील स्टॅन्डवरून बेकायदेशीर वाळू भरून निघालेले विना क्रमांकाचे दोन डंपर जात असल्याचे कोतवाल बाळू चव्हाण यांच्या लक्षात आले. चव्हाण यांनी दोन्ही डंपर अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी डंपर चालकांनी एक डंपर पळवून नेला.तर दुसरा डंपर पोलिस व महसूल खात्याच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान,दुसरा डंपर कोतवाल यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.
यात कोतवाल चव्हाण यास दहा ते पंधरा फूट फरफटत नेल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी डंपर चालक मालकसह दहा ते पंधरा जणांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात येताच सचिन माने-पाटील यांनी सदरच्या घटनेबाबत तहसीलदार सचिन पाटील यांना कल्पना दिली. पोलिसांनी गर्दी हटवित टेम्पो ताब्यात घेतला आहे.
