जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात पुन्हा रस्ते दुरूस्तीची कामे सुरू आहेत.नव्या रस्ते कामात दर्जा बासनात गुंडाळून ठेवल्याचे समोर येत आहे. तालुक्यात बांधकाम विभागाच्या भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांची साखळी पुन्हा सक्रीय झाली आहे. तालुक्यातील गेल्या वर्षभरात केलेले रस्त्याची भ्रष्ट साखळीने वाट लावली असून आईल मिश्रीत डांबराचा मुलामा दिलेले चकाचक रस्ते महिन्याभरात खड्डेमय झाल्याचे समोर आले आहे. तालुक्यात करण्यात आलेले नवे सर्वच रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन धारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.रस्त्यावर या खड्ड्यामुळे अनेकांना मणक्याचे आजार जडले आहेत.
तालुक्यातील अनेक दिवसापासून तळ ठोकलेल्या अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू असून त्यामुळे ठेकेदाराकडून मन मानेल तशी कामे केली जात आहेत.तालुक्यात आलेला निधी या भ्रष्ट साखळीने मोठ्या प्रमाणात फस्त केला असून निधीत कमिशन रूपी मोठा गाळा मारला जात असल्याने रस्ते कामाचा दर्जा हा विषय संपवून टाकल्याचे जत तालुक्यात चित्र आहे. यांची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी होत आहे.