अर्ज भरण्यासाठी झुंबड | ग्रामपंचायत निवडणूक | उद्या शेवटचा दिवस
जत,प्रतिनिधी : जत 30 ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज भरण्याकरिता सोमवार(दि.28)ला
उमेदवारांची झुंबड उडाली होती.सलग सुट्टीनंतर सुरू झालेल्या प्रक्रियेत सोमवारी तब्बल 123 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याकरिता इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी होणार आहे.
सलग सुट्यांमुळे ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून (दि.28) सुरू झाली आहे.याकरिता बुधवारी (दि.30) अंतिम मुदत असल्याने तहसीलदार कार्यालयांमध्ये पुढील 2 दिवस झुंबड उडणार आहे. तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. नाताळ व त्यानंतर लागून आलेल्या शनिवार, रविवारच्या सुटीमुळे अनेक उमेदवारांना अर्ज दाखल करता आले नाही. त्यामुळे आज, सोमवारपासून पुन्हा तहसीलदार कार्यालयांमध्ये उमेदवार आणि कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती.
अर्ज भरण्यास 23 डिसेंबरपासून सुरुवात झाली असून,30 पैंकी 15 ग्रामपंचायतींसाठी आतापर्यंत 123 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारांकडून दाखल झालेल्या अर्जांची गुरुवारी (दि.31) सकाळी 11 वाजता छाननी केली जाणार आहे.
सोमवारी दाखल झालेले गाववार दाखल अर्ज अंकले 19,भिवर्गी 6,
डोर्ली 3,गुगवाड 6,करेवाडी ति.1,कुडणूर 8,मेंढेगिरी 1,मोरबगी 1,शेगाव 8,टोणेवाडी 8,उमराणी 21,उंटवाडी 2,उटगी 17,वळसंग 10,येळदरी 12

बिनविरोधसाठी काही गावात प्रयत्न
आमदार विक्रमसिंह सांवत यांनी बिनविरोध ग्रामपंचायतीना 30 लाखाचा विकास निधी देण्याची घोषणा केल्याने अनेक गावात बिनविरोधसाठी गावस्तरीय नेते एकत्र येत प्रयत्न करत आहेत. तालुक्यात सात ते आठ ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जत तहसील कार्यालयासमोर अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी उसळली होती.