ना.जयंत पाटील यांनी जत कारखाना सभासदांना परत करावा | रासपचे नेते अजित पाटील यांचे आवाहन
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा व तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा साखर कारखाना असावा म्हणून राजे विजयसिंह डफळे यांनी जत मध्ये साखर करण्याची निर्मिती केली.तोच साखर कारखाना पुन्हा सभासदांच्या ताब्यात देऊन पालकमंत्री जयंत पाटील सभासदांना न्याय द्यावा,अशी मागणी रासपचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष अजित पाटील यांनी केली आहे.
पाटील म्हणाले,राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी राजे विजयसिंह डफळे यांच्या प्रयत्नातून जतच्या साखर कारखाना उभारणीला परवाना दिला होता.शिवाय मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते कारखान्याचे भूमिपूजनही केले होते.राज्यामध्ये सर्वात कमी खर्चात तयार झालेला अडीच हजार मँट्रीक टन गाळपाचा साखर कारखाना असा इतिहास जतच्या कारखान्याला लाभलेला आहे.आर्थिक अडचणीनंतर हा कारखाना जिल्हा बँकेने ना.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू कारखान्याने विकत घेतला आहे.
पाटील म्हणाले,हा कारखाना सभासदाच्या मालकीचा व्हावा यासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे.शिवाय जतचा साखर कारखाना पुन्हा एकदा सभासदांचा व्हावा ही तालुक्यातील जनतेची अपेक्षा आहे.सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे.त्या सरकारचे नेतृत्व योगायोगाने शरद पवार यांच्याकडे आहे.किंबहुना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले ना.जयंत पाटील हेच सांगली जिल्ह्याचे नेतृत्व करत आहेत.
जाणता राजा म्हणून ओळख असणारे शरद पवार यांनी या प्रकरणात लक्ष घालून जतचा कारखाना सभासदाचा करावा,ज्यामुळे तालुक्यातील बेरोजगार तरूणांना रोजगार मिळेल,शिवाय पोटाला पिळ देऊन सभासद फि भरलेल्या गरीब सभासदांना समाधान वाटेल.

पाटील म्हणाले,तालुक्याचे वरदान असणाऱ्या या साखर कारखान्याच्या मालकीची 208 एकर क्षेत्र असणाऱ्या जमीनीमधील वरील 58 एकर जमीन विक्री केली तरी कारखाना कर्जातून मुक्त होऊ शकला असता,असे तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांचा तर्क होता.आणि कारखाना सभासदांचाच राहावा ही भूमिका होती. पण त्या परिस्थिती मध्ये तस घडलं नाही.
परंतु अजूनही पालकमंत्री जयंत पाटील यांनी ठरवलं तर जत साखर कारखाना संभासदांचा होऊ शकतो.आणि तो ते नक्कीच मोठ्या मनाने करतील असा आत्मविश्वास मला वाटतो,कारण लोकनेते राजारामबापू पाटील यांचे ते पुत्र आहेत.बापूंचे जत तालुक्यावरील विशेष प्रेम आणि तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी केले ला संघर्ष आजही तालुक्याला माहित आहे.जत तालुक्यात हरितक्रांती आणण्याचे बापूचे स्वप्न होते.ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी ना.जयंत पाटील यांनी मोठ्या मनाने हा कारखाना सभासभादांच्या मालकीचा करावा,असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
कारखाना सभासदाचा केल्यास जाहीर सत्कार करू
अनेक शेतकरी,कर्मचारी,जतच्या जनतेची शान असलेला जतचा कारखाना ना.जयंत पाटील यांनी तालुक्यातील सभासदाच्या मालकीचा केल्यास त्यांचा आमचे नेते माजी मंत्री आ.महादेव जानकर यांच्याहस्ते मुख्य चौकात सत्कार करू,असेही पाटील यांनी सांगितले.